मुंबई: महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेल्या अॅक्युपंक्चर कौन्सिलमध्ये बहुतांशी सदस्य हे या क्षेत्राशी निगडित नाही. त्यामुळे अॅक्युपंक्चर तज्ज्ञांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. हे कौन्सिल तत्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात असून लवकरच हा वाद आता न्यायालयात पोहोचणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून अॅक्युपंक्चर कौन्सिल सदस्यांमध्ये खटके उडत आहेत. ज्याचे कारण योग्य ती डिग्री नसूनही काही सदस्यांना कौन्सिलमध्ये समाविष्ट करुन घेतले गेल्याचा आरोप काही डॉक्टर्सकडून केला जात आहे. हा वाद शिगेला तेव्हा पेटला जेव्हा या कौन्सिलमध्ये डॉ बेहरामजी यांना अध्यक्ष बनविण्यात आले. ‘आमचे मित्र डॉ. बेहरामजी हे जनरल प्रॅक्टिशनर असून फिजियोथेरेपीचा जास्त उपचार करतात व कौन्सिल स्थापनेबाबत निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नाहीत’, असा आरोप फिजिओथेरपीस्ट डॉ. योगेश कोंडकणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. बेहरामजी यांना मराठी अजिबात बोलता येत नाही आणि मराठी समजत देखील नाही. सत्तर टक्के अॅक्युपंक्चर पेशंट्स हे मराठी असल्यामुळे त्यांच्याशी ते कसा संवाद साधणार हा देखील प्रश्न त्यांनी विचारला आहे.
अॅक्युपंक्चर कौन्सिल वाद न्यायालयात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 5:23 AM