मुंबई : कोरोना संसर्गामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, ज्या हृदयातून ऑक्सिजन समृद्ध रक्ताने शरीरात नेण्यासाठी जबाबदार असतात. याला धमनी थ्रोम्बोसिस म्हटले जाते. कोरोनानंतर रक्त गोठण्यामुळे रक्तातील चिकटपणा वाढतो. गुठळ्या झाल्यामुळे धमनीमध्ये रक्तप्रवाहात अडथळा येतो. तसेच शरीराच्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
रक्तपुरवठा न झाल्याने पायांवर परिणाम होतो. तेव्हा गंभीररित्या पाय दुखणे, हात-पाय थंड होऊ शकतात आणि वेळीच उपचार न घेतल्यास रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होतो, गॅंग्रिनसारखी समस्या निर्माण होऊ शकते. या रक्तगुठळ्या आपल्या शरीरावर दिसून येतात आणि आपल्या अवयवांचे नुकसान करतात.
झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. राहुल शेठ म्हणाले, काहीवेळा कोरोनादरम्यान किंवा काहीवेळा ७ ते १० दिवसांच्या नंतर पुन्हा झालेल्या कोरोना पुनर्प्राप्तीदरम्यान ही लक्षणे दिसून येतील. उपचारांचा योग्य कालावधी हा लक्षणे दिसू लागल्यानंतर २४ तासांच्या आत असतो. पाय दुखणे, हात-पाय थंड पडणे यांसारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. कलर डॉपलर चाचणी ही रक्तवाहिन्यांमधील अडथळा शोधण्यासाठी उपयोगी ठरते.
आतापर्यंत २४ रुग्णांना धमनीतील गुठळ्यांच्या समस्येतून मुक्त केले आहे. आम्ही शस्त्रक्रिया न करता १७ अवयव वाचविण्यास यशस्वी ठरलो. उपचारास उशीर केल्याने ७ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. २४ रुग्णांपैकी २ रुग्ण पहिल्या लाटेत आणि २२ दुसऱ्या लाटेत दाखल झाले होते.