शिराळा : शासकीय नोकर, अधिकारी शासनाचा आदेश आला की ती योजना राबवायची, ही परंपरा मात्र शिराळा पंचायत समिती गटविकास अधिकारी दीपाली पाटील यांनी खंडित केली आहे. त्यांनी स्वत:हून ‘अपंग मित्र अभियान’ योजना राज्यात प्रथम राबविण्यास सुरुवात केली आहे. यातून अपंगांना अपंगत्वाचे दाखले मोफत देण्यात येत आहेत.शासनाच्या आदेशानुसार तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक यांच्यामार्फत सर्वेक्षण झाले होते. यामध्ये तालुक्यात १२३० अपंग असल्याचे आढळून आले. यापैकी ६७१ अपंगांना जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र मिळाले, मात्र ५५९ अपंगांना हे प्रमाणपत्र मिळालेले नाही. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हेलपाटे, वेळ, पैसा खर्ची पडतो. प्रमाणपत्र न मिळाल्याने या अपंगांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. सर्व अपंगांना योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांना दाखले मिळविण्यासाठी दीपाली पाटील यांनी पुढाकार घेतला.‘अपंग मित्र अभियान’ या नावाने ही योजना सुरू केली. तालुका वैद्यकीय अधिकारी आनंदराव कांबळे यांच्यासह सर्व पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांच्या तीन बैठका घेतल्या. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या सर्व ५५९ अपंगांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३६१ अपंगांचे अपंगत्व ४० टक्केपेक्षा जास्त निघाले. त्या सर्वांना अपंगत्वाचे दाखले देण्याची जबाबदारी उचलण्यात आली.यासाठी दि. ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर अशी अभियानाची तारीख ठरली. सौ. पाटील यांच्यासह सर्व आरोग्य अधिकारी, पंचायत समितीच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक यांनी खर्चाची जबाबदारी उचलली. सर्व रुग्णांना सांगली येथे सर्वोपचार रुग्णालयात नेले. या रुग्णालयात काम खोळंबू नये यासाठी दोन आरोग्य अधिकारी, प्रत्येक दहा अपंगांसाठीे एक आरोग्य सेवक, तसेच केसपेपर काढण्यासाठी लिपिक व मदतनीस तसेच दोन विस्तार अधिकारी असे पथक असते. हा सर्व खर्च पंचायत समिती कर्मचारी, अधिकाऱ्यांनी उचलला आहे.सौ. पाटीलही या अपंगांबरोबर जाऊन सहकार्य करीत आहेत. दररोज ४० अपंगांना सांगलीला खास एसटीने पाठविण्यात येते. त्यांच्याबरोबर दहा अधिकारी, कर्मचारीही असतात. अपंगांची तपासणी करून जिल्हा शल्यचिकित्सकांचे दाखले घेऊनच त्यांना घरी पोहोचविण्यात येते. या अभियानामुळे वंचित अपंगांना दिलासा देण्याचे काम होत आहे. (वार्ताहर)विनाशुल्क प्रमाणपत्र अपंगांना दिले जाते. सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की, नजरचुकीने एखाद्या अपंगाची नोंदणी राहून गेली असेल, तर आपली ग्रामपंचायत, जवळचे आरोग्य केंद्र, पंचायत समिती कार्यालय येथे संपर्क साधावा.सौ. दीपाली पाटील, गटविकास अधिकारी
शिराळ्यामध्ये अपंग मित्र अभियानास प्रारंभ
By admin | Published: September 10, 2014 11:08 PM