'अदानी एअरपोर्ट होल्डिंग'चे मुख्यालय मुंबईहून गुजरातला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:05 AM2021-07-21T04:05:55+5:302021-07-21T04:05:55+5:30
मुंबई : विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड'ने आपले मुख्यालय मुंबईहून अहमदाबादला स्थलांतरित ...
मुंबई : विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड'ने आपले मुख्यालय मुंबईहून अहमदाबादला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मुंबईसह अदानींच्या ताब्यातील सर्व विमानतळांचा प्रशासकीय कारभार गुजरातमधून चालविला जाणार आहे. त्यामुळे हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव तर नाही ना, अशा चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन 'जीव्हीके' समूहाकडून ताब्यात आल्यानंतर 'अदानी एअरपोर्ट' ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी ठरली. मुंबई विमानतळाचे ७४.५ टक्के समभाग विकत घेतल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही अदानी समूहाकडे हस्तांतरित झाले आहे. मुंबई विमानतळाच्या समभाग खरेदीची प्रक्रिया २०१९ला सुरू झाली. त्यामुळे 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड'ने आपले मुख्यालय मुंबईत थाटले. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर गेल्या आठवड्यात या विमानतळाचे व्यवस्थापन अदानींच्या ताब्यात आले. त्यांनतर 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग'चे मुख्यालय अहमदाबादला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळासह समाज माध्यमांतही उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मुंबई विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड'ने आपले कार्यालय कुठे स्थलांतरित करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, 'मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड'चे (मिआल) कामकाज मुंबईतूनच चालणार आहे. मुंबई विमानतळाचा विकास आणि परिचालन सुरळीत व्हावे यासाठी २ मार्च २००६ रोजी शासनाकडून या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
समाज माध्यमांत तीव्र प्रतिक्रिया
- अदानींच्या ताब्यात असलेल्या इतर विमानतळांपेक्षा मुंबई विमानतळ सर्वतोपरी मोठे आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी हाताळण्यात दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. असे असतानाही अदानी एअरपोर्टचे मुख्यालय मुंबईहून गुजरातला नेणे म्हणजे मुंबईचे महत्त्व कमी करण्यासारखे आहे, अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटू लागल्या आहेत.
- ‘फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलंय, विमानतळ मुंबईमध्येच आहे. आम्हाला डिवचण्यासाठी 'गरबा' कराल, तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल’, अशी खोचक प्रतिक्रिया मनसेच्या हवाई वाहतूक सेनेचे अध्यक्ष नितीन सरदेसाई यांनी दिली.
- अदानींचे मनसुबे आत्ताच हाणून पाडा अन्यथा मुंबईतील आंतरराष्ट्रीय प्रवासीही गुजरातला वळविण्यास त्यांना वेळ लागणार नाही, अशा आशयाचे ट्वीटही काही मुंबईकरांनी केले.