मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात विजेचा पुरवठा करत असलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर या दोन्ही वीज कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक म्हणजे पुढील पाच वर्षांसाठी विजेच्या दरात वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावानुसार, अदानी इलेक्ट्रिसिटीच्या घरगुती ग्राहकांचे वीजदर कमी होणार असून, टाटा पावरच्या वीजदरात मात्र वाढ होणार आहे. परिणामी, अदानी इलेक्ट्रिसिटीच्या घरगुती ग्राहकांना दिलासा मिळणार असून, टाटा पावरच्या ग्राहकांना विजेचा झटका बसणार आहे.अदानी इलेक्ट्रिसिटीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक वीज दरवाढीसाठीचा प्रस्ताव दाखल केला असून, तो २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ असा वर्षनिहाय आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीचा हा प्रस्ताव आयोगाने ८ जानेवारी रोजी दाखल करून घेतला आहे. या प्रस्तावानुसार, २०१९-२० साली १०० युनिटपर्यंत वीज वापरत असलेल्या वीज ग्राहकांचे वीजदर ३ रुपये २९ पैसे असून, २०२०-२१ सालासाठी हा वीजदर ३ रुपये १५ पैसे एवढा प्रस्तावित आहे. म्हणजे वीजदरात उणे ४ टक्क्यांची घट आहे. १०१ ते ३०० युनिटपर्यंतची वीज वापरत असलेल्या वीज ग्राहकांना ६ रुपये ५३ पैसे मोजावे लागत असून, आता हा दर ६ रुपये ५० पैसे प्रस्तावित आहे. यात उणे १ टक्क्याची घट होईल. ३०१ ते ५०० युनिट वर्गवारीसाठी सध्या विजेचा दर ७ रुपये ७२ पैसे असून, तो ७ रुपये ७५ पैसे प्रस्तावित आहे; ही वाढ ० टक्क्यात आहे. ५०० युनिटवरील वीज वापरकर्त्यांसाठीचे सध्याचे दर ९ रुपये ५७ पैसे असून, तो ९ रुपये ७० पैसे प्रस्तावित आहे. यातील वाढ १ टक्का आहे. २०२०-२१ या सालाप्रमाणेच २२, २३, २४ आणि २५ सालासाठीही अदानीने दरवाढीच्या प्रस्तावात उणे टक्क्यांत दर प्रस्तावित केले असून, त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.टाटा पॉवरने मात्र या उलट महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल करताना ग्राहकांना शॉक दिला आहे. ० ते १०० युनिटपर्यंतची वीज वापरत असलेल्या घरगुती वीज ग्राहकांच्या विजेचा दर २०१९-२० साठी १ रुपये ३५ पैसे आहे. टाटाने तो २ रुपये ६८ पैसे असा प्रस्तावित केला आहे. ही वाढ ९९ टक्के आहे. १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या विजेचा दर ४ रुपये ५ पैसे असून, तो ४ रुपये ४१ पैसे प्रस्तावित आहे. ही वाढ ९ टक्के आहे. ३०१ ते ५०० युनिटपर्यंतचे दर ७ रुपये ९३ पैसे आहेत. येथे मात्र हा प्रस्ताव ६ रुपये ६६ पैसे असून, ही घट उणे १६ टक्के आहे. ५०० युनिटपर्यंतच्या विजेचे दर १० रुपये १५ पैसे असून, येथे मात्र हा प्रस्ताव ७ रुपये ३६ पैसे आहे.>अंतिम निर्णय आयोगाचाअदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पावर या दोन्ही वीज कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावानुसार, अदानीने आपल्या वीजदरात घट दाखविली असून, टाटाने ३०० युनिटपर्यंत वाढ प्रस्ताविली आहे. या दोन्ही प्रस्तावांवर आयोगाकडून जनसुनावणी घेतली जाईल आणि त्यानंतर आयोग जो वीजदर लागू करेल, त्यानुसारच वीज कंपन्यांकडून वीज ग्राहकांना विजेची बिले आकारली जातील.>जनसुनावणी : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने अदानी आणि टाटा या दोन्ही वीज कंपन्यांच्या वीज दरवाढीवर ग्राहकांच्या सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. वीज ग्राहकांना मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत आयोगाकडे ३१ जानेवारीपूर्वी सूचना, हरकती दाखल करता येणार आहेत. सूचना आणि हरकती दाखल झाल्यानंतर, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता वर्ल्ड टेÑड सेंटर येथील सेंट्र्युम हॉलमध्ये जनसुनावणी होईल.
अदानीची वीज स्वस्त; टाटाची महाग होणार, मुंंबईकरांना झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 5:19 AM