Join us

AEML मोठी कारवाई! दक्षता पथकाने ५० लाखांची वीजचोरी पकडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 1:44 PM

अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून अशा वीजचोरीच्या दोन्ही युनिट्सच्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. 

मुंबई: अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या दक्षता पथकाने पश्चिम उपनगरामध्ये दोन ठिकाणी इंडस्ट्रियल युनिट्सच्या विजेचा वापर आणि वीजदेयकाची आकडेवारी पडताळणी केली. या पडताळणीत प्रत्यक्ष विजेच्या पुरवठ्याच्या तुलनेत वीज देयकाच्या आकडेवारीत तफावत आढळून आली. संपूर्ण फीडरचा डेटा निरीक्षण केल्यानंतर या दोन इंडस्ट्रीयल युनिटच्या माध्यमातून ५० लाखांची विजेची चोरी केल्याचे दक्षता पथकाच्या धाडीत आढळून आले आहे. 

मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मालाड पूर्वेच्या इरानी वाडी येथे अल्ताफ शेख आणि सय्यद इम्रान यांचे वर्टीकल माऊंटिंग युनिट आहे. याठिकाणी ग्राहकांकडून थेट विजेचा वापर करण्यात येत असल्याचे आढळले. गेल्या दोन वर्षांपासून येथे युनिटमध्ये २८.४४ लाख रूपयांच्या युनिट विजेचा अनधिकृत वापर झाल्याचे दक्षता पथकाला आढळले. दुसऱ्या एका वीजचोरी प्रकरणात कांदिवली पश्चिमेच्या चारकोप गांधी नगर येथे हमीद उल्ला शेख यांच्याकडून चालवणाऱ्या जाणाऱ्या इलेक्ट्रो प्लेटिंग युनिटमध्ये विजेची चोरी आढळली आहे. याठिकाणी २१.७५ लाख रूपयांच्या विजेची चोरी झाल्याचे आढळले आहे. 

वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा

अदाणी इलेक्ट्रिसिटी एक जबाबदार वीज सेवा पुरवठादार कंपनी म्हणून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणा करणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदरवाढीचा बोजा पडतो. त्यामुळेच अशा प्रामाणिक नियमित वीजबिल अदा करणाऱ्या ग्राहकांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे, असे अदाणी इलेक्ट्रिसिटीचे प्रवक्ते म्हणाले. 

दरम्यान, अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून अशा वीजचोरीच्या दोन्ही युनिट्सच्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. तसेच एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत याप्रकरणी ४५ एफआयआर दाखल करण्यात आले होते. मात्र, एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत १६९ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. अनियमिततेसाठीचा गुन्हा दाखल केलेली प्रकरणे एप्रिल ते जून २०२१ दरम्यान ११३७ होती, ती वाढून या वर्षी त्याच कालावधीत १९८३ झाली आहेत.  

टॅग्स :अदानीवीज