'माझ्याकडे काही पाहुणे येणार आहेत', राज ठाकरेंनी एवढीच दिलेली कल्पना; मग म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 06:26 AM2023-01-11T06:26:25+5:302023-01-11T06:26:44+5:30
गेल्या काही दिवसांत राजकीय क्षेत्रातील चौथ्या व्यक्तीची भेट अदानी यांनी घेतली आहे.
मुंबई : अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची मंगळवारी संध्याकाळी भेट घेतली. या भेटीचा कोणताही गाजावाजा करण्यात आला नव्हता. अदानी यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांत राजकीय क्षेत्रातील चौथ्या व्यक्तीची भेट अदानी यांनी घेतली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीविषयी कोणालाही कल्पना नव्हती. सायंकाळी साडेसहा वाजता राज ठाकरे यांनी माझ्याकडे काही पाहुणे येणार आहेत एवढीच कल्पना दिली. ७ वाजता त्यांनी हर्षल देशपांडे आणि काही लोकांना अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम आदमी येत आहेत त्यांना घेऊन या, अशा सूचना दिल्या. दोघांमध्ये ७.१५ ते ८.१५ अशी एक तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान दोघांशिवाय अन्य कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही. दोघांमध्ये हास्य-विनोदही रंगले होते, असे तिथे असणाऱ्यांनी सांगितले. जाताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित आणि मिताली ठाकरे यांच्या समवेत छायाचित्रेही काढण्यात आली.
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची अदानी यांनी भेट घेतली होती. धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याची निविदा नुकतीच अदानी समूहाने मिळविली आहे. धारावीचा पुनर्विकास हादेखील चर्चेचा एक भाग असू शकतो, असे समजते. पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना, महाराष्ट्र सर्वार्थाने श्रीमंत आहे, एखाद दुसरा उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे फार नुकसान होणार नाही. एखादा उद्योग जाणे म्हणजे ‘दर्या में खसखस’ असा प्रकार आहे, असे विधान केले होते. त्याचवेळी आपण गुजरातचे आहोत. म्हणून त्याच भागाला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना योग्य दिसत नाही. राज्यकर्ता मोठ्या मनाचा असावा; तो कधीच व्यापारी नसावा, असे परखड मतही व्यक्त केले होते.