मुंबई- आज दिवसभर महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्याही मोठ्या हालचाली घडल्या नाही, पण सायंकाळी अचानक दोन मोठ्या घटना घडल्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वरओकवर दाखल झाले.
अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. हिंडनबर्ग रिपोर्टनंतर विरोधक अदानी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधकांनी जेपीसीची मागणी केली आहे. पण, याउलट शरद पवारांनी जेपीसीची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वांच्याय भूवया उंचावल्या होत्या.
Video: शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यात; CM शिंदेंनी सांगितलं भेटीचं कारण
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतरही अनेक चर्चाही सुरू झाल्या होत्या. आजच्या भेटीनंतरही चर्चेला उधाण आले आहे. मात्र, ही भेट नेमकी कशासाठी होत आहे, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.