Join us  

मुंबईच्याबाहेर देखील आता अदानी विजेचा पुरवठा करणार, महावितरण आणि अदानीमध्ये स्पर्धा

By सचिन लुंगसे | Published: November 26, 2022 11:43 AM

मुंबईच्या उपनगरात वीज पुरवठा करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी ही वीज कंपनी आता भांडूप, मुलुंड, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबई, खारघर, पनवेल, तळोजा, जे एन पी टी परिसरात विजेचा पुरवठा करणार आहे.

मुंबई :

मुंबईच्या उपनगरात वीज पुरवठा करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी ही वीज कंपनी आता भांडूप, मुलुंड, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबई, खारघर, पनवेल, तळोजा, जे एन पी टी परिसरात विजेचा पुरवठा करणार आहे. सद्यस्थितीमध्ये या परिसरामध्ये केवळ महावितरणची वीज असून, अदानी इलेक्ट्रिसिटी या स्पर्धेमध्ये उतरली तर येथील वीज ग्राहकांना विजेसाठी दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. महत्वाचे म्हणजे या परिसरामध्ये विजेचा  पुरवठा करताना अदानी इलेक्ट्रिसिटी आपले स्वतःचे विजचे जाळे उभारणार असून, महावितरणच्या विजेच्या दरापेक्षा अदानीचे वीज जर कमी राहिले तर आपसूकच महावितरणचे वीज ग्राहक अदानी इलेक्ट्रिसिटीकडे वळतील.

अदानी इलेक्ट्रिसिटी या वीज कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे भांडूप, मुलुंड, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबई, पनवेल, तळोजा, खारघर, जे एन पी टी परिसरात विजेचा पुरवठा करता यावा म्हणून परवानगी मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आयोगामध्ये पुढील तीन एक महिन्यांमध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी झाली आणि अदानी इलेक्ट्रिसिटीला या परिसरामध्ये वीज पुरवठा करण्याची परवानगी मिळाली तर त्या पुढील प्रक्रिया म्हणून अदानी इलेक्ट्रिसिटी या परिसरातील विजेचे दर ठरविण्यासाठी आयोगाकडे पुन्हा एकदा याचिका दाखल करेल. याचिका दाखल झाल्यानंतर या याचिकेवर सुनावणी होऊन विजेचे दर ठरविले जातील. वीज खरेदीचे दर आणि वीज ग्राहकांच्या सूचना आणि हरकतींची नोंद घेऊन विजेचे दर ठरविले जाण्यासाठी किमान सहा ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटी या वीज कंपनीला या परिसरामध्ये वीज पुरवठा करण्याचा परवाना दिला तर साहजिकच महावितरण आणि अदानी या दोन वीज कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. आणि वीज ग्राहकांना आपली वीज कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य देखील मिळेल.

टॅग्स :अदानी