प्रकल्प अदानीचा, शॉक वीज ग्राहकांना! प्रति युनिट सात पैशांचा भार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 08:09 AM2021-03-24T08:09:05+5:302021-03-24T08:09:22+5:30
उच्च दाब पारेषण वाहिनीचे काम, मुंबईत येणार १ हजार मेगावॅट वीज
मुंबई : गेल्या वर्षी मुंबईत खंडित झालेल्या वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर आता अनेक उपाययोजना केल्या जात असतानाच कुडूस ते आरे येथील उपकेंद्रादरम्यान उच्च दाबाची वीज पारेषण वाहिनी बसविण्याचे काम अदानी या वीज कंपनीला मिळाले आहे. सुमारे सात हजार कोटींचे हे काम अदानी वीज कंपनीला देण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य वीज नियामकला दिला असून, येत्या चार वर्षांत सदर वीज कंपनीला उच्च दाब पारेषण वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करायचे आहे. दरम्यान, या वीज प्रकल्पामुळे मुंबईसह राज्यभरातील वीज ग्राहकांवर सात पैशांचा भार पडेल.
कुडूस ते आरेदरम्यान ८० किलोमीटर लांबीची उच्च दाबाची पारेषण वाहिनी टाकण्यात येईल. हे काम करतानाच यासाठी सात हजार कोटी एवढा खर्च येईल; मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हा खर्च ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार असून, वीज ग्राहकांवर प्रति युनिट सुमारे सात पैशांचा बोजा पडू शकतो. येथे उच्च दाबाची पारेषण वाहिनी टाकण्यासाठी परवाना मिळावा म्हणून अदानी वीज कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. हा प्रकल्प राबविताना काही भाग भूमिगत असेल, याद्वारे मुंबईत १ हजार मेगावॅट एवढी वीज वाहून आणता येईल.
८० किलोमीटरच्या प्रकल्पापैकी काही अंडरग्राउंड आहे. अंडरग्राउंड कुडूस-आरे लिंक हा पुढील चार वर्षात पूर्ण होईल. काम पूर्ण झाल्यावर हे प्रकल्प मुंबईच्या ट्रान्समिशन सिस्टमला वाढवतील. आयलँड सिटीला ३६५ दिवस वीज पुरवठा होत राहील, असा दावा केला जात आहे.
वर्षाला १४०० कोटींचा बोजा
सदर प्रकल्पासाठीचा सहा ते सात हजार कोटी असा भांडवली खर्च पकडता त्यावरील व्याज वाढते. यापुढचा भाग म्हणजे देखभाल-दुरुस्ती होय. काही वर्षांनी प्रकल्पातील साहित्य बदलावे लागेल. म्हणजे पुन्हा त्याचा घसारा आला. त्यात या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी माणसे लागतील. म्हणजे खर्च वाढणार. बारा टक्के व्याज, सहा टक्के घसारा, चार टक्के दुरुस्ती. म्हणजे २० टक्के. ही सगळी गोळाबेरीज पकडता सात हजार कोटी रुपयांवर वर्षाला १४०० कोटींचा बोजा वाढेल. संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांकडून हे पैसे वसूल केले जातील. परिणामी, प्रत्येक वीज ग्राहकावर प्रति युनिट सात पैसे एवढा बोजा येईल. - अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ.