Join us

माझं नाव १०० लोकांसोबत जोडलं, आणखी किती त्रास देणार आहात?; चित्रा वाघ पवारांच्या राष्ट्रवादीवर भडकल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 5:42 PM

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

BJP Chitra Wagh ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनीही पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केला आहे. "मी तुमच्या पक्षात २० वर्षे होती. तुमच्यावर बापासारखंच प्रेम केलं. पण तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्या कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, खोटे आरोप केले. पण मी सगळं सहन केलं. आता पुन्हा विद्या चव्हाण यांना माझ्यासमोर उभं केलं आहे. माझी बदनामी करून झाली, माझी नावं १०० लोकांसोबत जोडून झाली. सुप्रियाताई, तुम्ही ४-५ बायका माझ्याविरोधात पत्रकार परिषद घ्यायला बसवल्या. त्यांनी माझ्याबद्दल वाटेल ते बोलून घेतलं आणि आता परत तुम्ही हिला पाठवलं. सुप्रियाताई तुम्ही एक महिला तर आहात. तुमच्याही मनात भावना असतील ना?" असा सवाल करत वाघ यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

विद्या चव्हाण यांच्या आरोपांना उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "मी २० वर्ष माझ्या पायाची कातडं करून पक्षाला दिली आहेत. पक्षाने मला एकही लाभाचं पद दिलं नाही. मात्र माझ्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली मी ११० टक्के काम करत ती जबाबदारी पार पाडली. मी जर सगळं बोलले तर सुप्रिया सुळे आणि पवारसाहेबांची अडचण होईल," असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.

दरम्यान, "विद्या चव्हाण यांची सूनच तिच्यावर अन्याय झाल्यानंतर स्वत:हून माझ्याकडे आली होती. चव्हाण यांच्या मुलाने तिच्या वहिनीचा विनयभंग केला होता आणि त्यानंतर सूनेनं तक्रार दाखल करू नये, यासाठी विद्या चव्हाण यांनी तिच्यावर दबाव आणला होता. त्यामुळे मी तिची मदत केली. अशा महिलेला मदत करणं, हा जर गुन्हा असेल तर मी असे १०० गुन्हे करायला तयार आहे," अशी भूमिकाही चित्रा वाघ यांनी मांडली आहे.

"अनिल देशमुखांनी पेन ड्राइव्ह काढावा, ३ तासांत ऑडिओ क्लिप व्हायरल करू" 

चित्रा वाघ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही लक्ष्य केलं आहे. देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील कथित पेन ड्राइव्ह बाहेर काढावा, आम्ही तीन तासांत देशमुखांच्या सर्व ऑडिओ क्लिप व्हायरल करू, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. 

टॅग्स :चित्रा वाघराष्ट्रवादी काँग्रेसभाजपासुप्रिया सुळे