नेरूळमध्ये व्यसनमुक्तीपर जनजागृती मोहीम
By Admin | Published: September 12, 2014 01:47 AM2014-09-12T01:47:53+5:302014-09-12T01:47:53+5:30
डी. वाय. पाटील हॉस्पिटल, संशोधन केंद्र आणि अन्वय व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लोकांमध्ये व्यसनाविषयी जनजागृती मोहीम सुरू आहे.
नवी मुंबई : डी. वाय. पाटील हॉस्पिटल, संशोधन केंद्र आणि अन्वय व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लोकांमध्ये व्यसनाविषयी जनजागृती मोहीम सुरू आहे. व्यसनापासून होणारी हानी टाळण्यासाठी अन्वयार्थ या विशेष अंकाचे नेरूळ येथे नुकतेच प्रकाशन झाले. यामाध्यमातून जास्तीत जास्त लोकांमध्ये व्यसनाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
लोकांमध्ये व्यसनापासून उद्भवणाऱ्या रोगांविषयीची जनजागृती अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून केली जात आहे. वाशी येथील मनपा प्रथम संदर्भ रूग्णालयात व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत आतापर्यंत जवळपास ११०० पेक्षा अधिक रूग्णांचे समुपदेशन करण्यात आले आहे. २२ डॉक्टर्स व समुपदेशक काम करत आहेत. तसेच अनेक सेवाभावी संस्था ही या कामामध्ये सहभाग घेत आहेत. अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे. व्यसन आणि रोगांविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी. यासाठी अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने अन्वयार्थ या विशेष अंकाचे प्रकाशन केले आहे. यामध्ये व्यसनामुळे होणारे दुष्परिणामाविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून व्यसनामुळे होणाऱ्या विविध रोगांची लक्षणे दाखविण्यात आली आहेत. लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अन्वय व्यसनमुक्ती संस्था काम करत आहे. यापुढे ही विविध संस्थांनी पुढे येवून या कार्याला हातभार लावला पाहिजे. यामुळेच समाजातील व्यसनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे डी. वाय.पाटील हॉस्पिटलच्या संचालक डॉ. रश्मीन चोलेरा यांनी सांगितले.
यावेळी रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे चीफ ट्रेझरी आॅफिसर सुरेश रोटेरियन, डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे डॉ. श्याम मोरे, डॉ. अजित मगदूम, वृषाली मगदूम, अनिल लाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.