Join us

बीबीए, बीसीए, बीएमएसला ‘बीएस’ची जोड; BS म्हणजे काय?

By रेश्मा शिवडेकर | Published: February 09, 2024 7:40 AM

‘एआयसीटीई’च्या कठोर निकषांना बगल देण्यासाठी नामकरणाची पळवाट

रेश्मा शिवडेकर लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बीबीए, बीसीए, बीएमएस या अभ्यासक्रमांना ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’चे (एआयसीईटी) कठोर निकष लागू नये, म्हणून त्यांचे नामकरण करून नियमांना बगल देण्याचा विचार सुरू आहे. याकरिता बी.कॉम, बी.एस्सी या पारंपरिक पदवीअंतर्गत किंवा ‘बीएस’ (बॅचलर ऑफ सायन्स) या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या नावाने हे अभ्यासक्रम राबविण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्रात दरवर्षी ८० हजारांच्या आसपास विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.

मुंबईतील प्राचार्यांच्या संघटनांकडून आलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने आणि ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (युजीसी) मान्यता दिल्यास विद्यापीठांकडेच या अभ्यासक्रमांचे नियमन राहील. तसेच, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर ‘एआयसीटीई’च्या कठोर निकषांतून पळवाट काढणे महाविद्यालयांना शक्य होईल. 

‘एआयसीटीई’ने या कॉलेजांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकष लावण्याबाबत सध्यातरी अवाक्षर काढलेले नाही. मात्र, भविष्यात अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या निकषांचे पालन कॉलेजांना करावे लागेल. सीईटीआधारे प्रवेश, शिक्षण शुल्क समितीकडून शुल्कनिश्चिती याबरोबरच विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, इतर शैक्षणिक व भौतिक सुविधा याबाबतच्या कठोर निकषांची पूर्तता पारंपरिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांना करता येणे शक्य नाही. उदा. कॉलेजला एआयसीटीईच्या विद्यार्थी : शिक्षक या निकषाचे (२०:१) पालन करायचे ठरल्यास प्रत्येक तुकडीमागे (६० विद्यार्थी) शिक्षकांची संख्या तीनपट वाढवावी लागेल. त्यामुळे धास्तावलेल्या महाविद्यालयांनी नुकतीच ‘युजीसी’चे अध्यक्ष जगदीश कुमार यांची भेट घेतली.

बीएस म्हणजे काय?युजीसीने जून, २०२३ मध्ये कला, मानव्य, वाणिज्य, व्यवस्थापन या शाखांसाठीही बॅचलर ऑफ सायन्स (बीएस) ही पदवी लागू करण्याचे ठरविले आहे. या पदवीचे स्वरूप पाहता बीबीए, बीसीए हे अभ्यासक्रम याअंतर्गत चालविणे शक्य आहे.

...तर कॉलेजेस बंदएआयसीटीईचे निकष लावायचे ठरवले तर ग्रामीण भागातील महाविद्यालयांना हे अभ्यासक्रम बंदच करावे लागतील. शुल्क वाढविल्याशिवाय हे अभ्यासक्रम राबविणे शक्य नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे अव्वाच्या सव्वा शुल्क न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईतील प्राचार्यांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. टी. ए. शिवारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

मुंबईत परिणाम मोठामुंबईत १५५ महाविद्यालयांत हे अभ्यासक्रम राबविले जातात. प्रवेशासाठी तर विद्यार्थ्यांमध्ये मोठी रस्सीखेच असते. त्यामुळे मुंबईत या बदलाचा परिणाम मोठा आहे. मुंबईत गेल्या वर्षी १४ हजार तर पुण्यात १६ हजार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता.

टॅग्स :मुंबईविद्यापीठ