पोलिसांच्या गस्तीत अत्याधुनिक वाहनांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:08 AM2021-01-16T04:08:35+5:302021-01-16T04:08:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई पोलिसांच्या गस्तीसाठी नवनवीन यंत्रणा सज्ज होत आहे. अशात, समुद्रकिनारी गस्त घालण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गस्तीसाठी नवनवीन यंत्रणा सज्ज होत आहे. अशात, समुद्रकिनारी गस्त घालण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात ‘सेगवे’ म्हणजेच स्वयंसंतुलित विद्युत स्कूटरचा समावेश झाला आहे. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणेसह मुंबई पोलीस मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत दिवस-रात्री प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत गस्त सुरू असते. यात, पोलीस गस्तीसाठी पोलीस व्हॅन, मोबाइल व्हॅनसह अत्याधुनिक मोबाइल व्हॅन, सायकल, दुचाकी, घोडे यांच्यासह सेगवेची भर पडली आहे. ही स्कूटर ताशी २० किमी गतीने धावू शकते. या यंत्रणेचे उद्घाटन २ जानेवारीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता अक्षय कुमार, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह इत्यादींच्या उपस्थितीत पार पडले आहे. याद्वारे अधिक ठिकाणी गस्तीवर भर देण्यास पोलिसांना मदत होत आहे.
मुंबईतल्या मोटार विभागाअंतर्गत मुंबई पोलिसांच्या वाहनांची देखरेख करण्यात येत आहे. १९ डिसेंबर १९३२ रोजी सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या चालकांनी चालवलेल्या काही जुन्या वाहनांसह मुंबईत मोटर परिवहन विभाग सुरू करण्यात आला. सन १९४७ नंतर वाहनांची संख्या वाढली. १९७२ मध्ये वाहनांची संख्या ४७२ होती. अपर पोलीस आयुक्त (तांत्रिक) हे सध्या विभागाचे मुख्य अधिकारी असून त्यांच्या अंतर्गत ०२ पोलीस उपायुक्त कार्यरत आहेत. वाहने आणि नौकांविषयी पोलीस आयुक्तांना तांत्रिक सल्लागार म्हणून कार्य करणे, नवीन वाहने खरेदी करणे, जुनी वाहने मोडीत काढणे, वाहनांचे किरकोळ भाग, इंधन खरेदी करणे, पोलीस ठाणे आणि इतर शाखा / विभागांना बंदोबस्त आणि गस्तकामी वाहने पुरविणे, मुंबईतील अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीदरम्यान पायलट, एस्कॉर्ट आणि इतर वाहने पुरविणे तसेच सर्व वाहने सुस्थितीत ठेवणे, स्पीड बोट्स सुस्थितीत ठेवणे, चालक, तंत्रज्ञ, लॉन्च आणि तांत्रिक कर्मचारी यांची हजेरी आणि कल्याण याकडे लक्ष देण्याची जबाबदारीही या विभागाकडे असते.
......
मोटार परिवहन विभागाचे आधुनिकीकरण
सुसज्ज प्रशिक्षण, कॉन्फरन्स हॉल, मानवी परिश्रम आणि कामाचे तास वाचविण्याकरिता हवेच्या दाबावर चालणारी साधने (न्यूमॅटिक टूल्स) आणि दोन केंद्रे उभारली आहेत. तसेच बॉयोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली आणि सीसीटीव्ही नियंत्रण रूमचाही यात समावेश आहे.
....
चालते-फिरते कंट्रोल रूम
आंदोलन, मोर्चे यादरम्यान सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांच्या अद्ययावत मोबाइल व्हॅनही कार्यरत आहेत. यात, इमर्जन्सी रिस्पान्स, मोबाइल सर्वेलियन्स आणि कमांड सेंटर नावाची अद्ययावत अशी स्वत:ची एक छोटी कंट्रोलरूम असणाऱ्या व्हॅनचा समावेश आहे.
......
गेल्या वर्षभरात १४९९ घरफोड्या
गेल्या वर्षभरात मुंबईत ३० नोव्हेबरपर्यंत
घरफोडीचे (दिवस-रात्र) १ हजार ४९९ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ७१६ गुह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १ हजार ८८९ होता. त्यापैकी ८६३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
....