रेल्वे प्रवाशांना बेस्ट चा अतिरिक्त दिलासा
By सीमा महांगडे | Published: October 25, 2023 08:04 PM2023-10-25T20:04:12+5:302023-10-25T20:04:24+5:30
मुंबई : खार व गोरेगाव दरम्यान २६-२७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते ५ नोव्हेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेवरील सहावी मार्गिका सुरु करण्याचे काम होणार ...
मुंबई: खार व गोरेगाव दरम्यान २६-२७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते ५ नोव्हेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेवरील सहावी मार्गिका सुरु करण्याचे काम होणार असल्याबाबतचे पश्चिम रेल्वे प्राधिकारणाने परिपत्रक जाहिर केले आहे. या अनुषंगाने पश्चिम रेल्वे वेळापत्रकातील जवळपास ३०० हून अधिक फे-या दररोज रद्द होणार आहेत किंवा उशिरा धावणार आहेत. या फे-या रह किंवा उशिरा धावल्याने मुंबईतील प्रवाशांना होणारी गैरसोय दूर करण्याकरिता बेस्ट उपक्रमाने मदतीचा हात दिला आहे. पश्चिम रेल्वेला समांतर असलेल्या एस. व्ही. रोड, लिंक रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या रस्त्यांवर धावणा-या २०२ मर्यादित, २०३, ४ मर्यादित ८४ मर्यादित, ३३, २२५, ४४० मर्यादित ४० मर्यादित इत्यादी बसमार्गांवर अतिरिक्त बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशाना दिलासा मिळेल अशी अपेक्षा बेस्ट उपक्रमाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार/डहाणू रोडदरम्यान रोज एक हजार ३८३ लोकल फेऱ्या धावतात. यातून २८ ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. सहाव्या मार्गिकेच्या जोडकामाचे मुख्य काम २६-२७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्या रद्द होणार आहे. दरम्यान या कालावधीत रिक्षा-टॅक्सीला मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास खर्च तर वाढेलच शिवाय लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे होणार अमनस्ताप ही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बस गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामुळे पुढील आठवडा पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची परीक्षा पाहणारा असणार आहे.
आवश्यकता असेल तिथे नियोजन
या कालावधीमध्ये आगार अधिका-यांना बोरीवली ते चर्चगेट दरम्यान रेल्वेस्थानकांकडील बसस्थानकांतील मुख्यतः गोरेगाव ते सांताक्रुश दरम्यान, प्रवाशांच्या गर्दीचे अवलोकन करुन त्वरीत बसगाडयांचे नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.