Join us

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. अश्विनी जोशी यांची नियुक्ती

By सीमा महांगडे | Published: September 15, 2023 4:20 PM

डॉ. जोशी या भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००६ बॅचच्या अधिकारी आहेत. त्‍यांनी मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय येथून बी. डी. एस. ही पदवी संपादन केली

मुंबई - राज्‍याच्‍या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागाच्‍या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांची राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त  आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्‍यानुसार, डॉ.जोशी यांनी शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) पदाचा पदभार स्वीकारला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत यांनी डॉ. जोशी यांचे स्वागत केले.

डॉ. जोशी या भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००६ बॅचच्या अधिकारी आहेत. त्‍यांनी मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय येथून बी. डी. एस. ही पदवी संपादन केली. नागपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, अकोला येथे आदिवासी विकास प्रकल्‍पाच्‍या  प्रकल्प अधिकारी,  भंडारा जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी,  मुंबई उपनगर जिल्ह्याच्‍या अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, अकोला व सिंधुदुर्ग जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी, शिधावाटप नियंत्रक आणि संचालक - नागरी पुरवठा, (मुंबई) तसेच ठाणे व मुंबई जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्‍या आयुक्‍त, विकास आयुक्‍त (असंघटीत कामगार) इत्‍यादी विविध पदांवर कामकाज केले आहे. एकूण १७ वर्षांच्या आपल्या प्रशासकीय कारकीर्दीत डॉ. (श्रीमती) जोशी यांनी महाराष्ट्र शासनामध्ये विविध महत्वपूर्ण पदांच्या जबाबदाऱया सांभाळताना विशेष ठसा उमटवला आहे.

जवळपास दीड महिन्यानंतर पालिकेला अतिरिक्त आयुक्त

महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांची २७ जुलैला महामेट्रो नागपूरच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती झाली होती. यानंतर कोविड घोटाळा उघडकीस येऊन त्याचा तपास ईडी व एसआयटीने सुरु केला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त म्हणून येण्यास कोणीही उत्सुक नव्हते. यामुळे तत्काळ होणारी नियुक्ती दीड महिना लांबणीवर पडली होती.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका