२५० एसटी बस चालविण्यासाठी रायगडवरून अतिरिक्त चालक-वाहक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 07:07 PM2020-06-07T19:07:07+5:302020-06-07T19:07:24+5:30
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, मंत्रालय, अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी २५० अतिरिक्त बस चालविण्यात येणार आहेत.
मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, मंत्रालय, अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी २५० अतिरिक्त बस चालविण्यात येणार आहेत. या अतिरिक्त बस चालविण्यासाठी रायगडवरून सुमारे १०० चालक आणि वाहक दाखल झाले आहेत. यासह आवश्यकता भासल्यास राज्यभरातून कर्मचारी दाखल होण्याची शक्यता आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ४०० बस धावत आहेत. यामध्ये आणखी २५० बसची भर पडणार आहे. या सर्व बस योग्य रीतीने सॅनिटाराईज केलेल्या असतील. प्रवासात फिजिकल डिस्टंनसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. या बस पनवेल, पालघर, आसनगाव ,विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून धावणार असून, पैकी १४२ बस मंत्रालय, १५ बस महापालिका भवन मार्गावर धावणार आहेत. उर्वरित बस मुंबई महानगर प्रदेशातंर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता धावतील.
---------------------
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी या सर्वांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल ४०० बसद्वारे दररोज ८०० पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात. दररोज सुमारे १४-१५ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण एसटीच्या बसेसद्वारे केली जाते. गरज भासल्यास आणखीन जादा बसेस एसटी कडून सोडण्यात येतील, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
---------------
खासगी कर्मचारी देखील प्रवास करू शकतात
खासगी कंपनीमधील कर्मचाऱ्यांना देखील आपले ओळखपत्र दाखवून या बसमधून प्रवास करण्याची मुभा असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
----------------
- शहापूर-मंत्रालय-शहापूर १६ फेऱ्या
- बदलापूर-मंत्रालय-बदलापूर ७६ फेऱ्या
- डोंबिवली-मंत्रालय-डोंबिवली ६० फेऱ्या
- कल्याण-मंत्रालय-कल्याण १२ फेऱ्या
- टिटवाळा-मंत्रालय-टिटवाळा ८ फेऱ्या
- कळवा-मंत्रालय-कळवा ६ फेऱ्या
- ठाणे-मंत्रालय-ठाणे १० फेऱ्या
- मिरा रोड-मंत्रालय – मिरा रोड ४ फेऱ्या
- परळ-अलिबाग-परळ २६ फेऱ्या
- कुर्ला-पनवेल-कुर्ला ५० फेऱ्या
- पनवेल-डोंबिवली, कल्याण ५२ फेऱ्या
पाचवे लॉकडाऊन शिथिल केले आहे. त्यामुळे सोमवारपासून जास्त संख्येने प्रवासी बाहेर पडतील. या प्रवाशांच्या सोयीसाठी शहरांतर्गत फेऱ्या धावणार आहेत. ठाणे-बोरिवली, ठाणे-भाईंदर, ठाणे-पनवेल, मुंबई सेंट्रल-अलिबाग या मार्गावर एसटी धावणार आहे.