Join us

शहरातील रस्ते धुण्यासाठी वाढीव टँकर; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३१ डिसेंबरला महास्वच्छता अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:10 AM

मुंबई प्रदूषण आणि धूळमुक्त करण्यासाठी पालिकेने रस्ते धुण्याची मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई :मुंबई प्रदूषण आणि धूळमुक्त करण्यासाठी पालिकेने रस्ते धुण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला वेग देण्यासाठी प्रत्येक वॉर्डात अतिरिक्त १० पाण्याचे टँकर पुरविले जाणार आहेत.  सध्या पालिकेकडे स्वतःचे ३५ आणि कंत्राटदारांचे मिळून १०० टँकर आहेत. यामुळे आता ३५० टँकर रस्ते धुण्यासाठी वापरले जातील. टँकर वाढविण्याच्या सूचना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिल्या आहेत.  टँकरच्या माध्यमातून दोन हजार किलोमीटर रस्त्यांपैकी १ हजार किमीचे रस्ते धुतले जातील. 

 सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते धुतले जात आहेत. पालिकेच्या अखत्यारीत दोन हजार किमीचे रस्ते असून, त्यापैकी सुमारे ७०० किमीचे रस्ते धुण्याचे काम सध्या सुरू आहे. 

 आता दररोज एक हजार किमीचे रस्ते धुतले जाणार आहेत. टँकरच्या  वाढीव संख्येमुळे हे काम शक्य होणार आहे. ३१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत १० ठिकाणी महास्वच्छता अभियान  राबविले जाणार आहे. 

या मोहिमेचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून होईल. या ठिकाणी एक हजार स्वच्छता  कर्मचारी असतील. पालिकेने हाती घेतलेले संपूर्ण स्वच्छता अभियान राज्य पातळीवर राबविले जाणार आहे.   

मुंबईतील धूळ आणि प्रदूषणाला मुंबईत सुरू असलेले सात मोठे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला होता. सर्वांत जास्त प्रकल्प हे मेट्रो मार्गांचे आहेत. 

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदे