अतिरिक्त शिक्षकही ऑनलाइन शिक्षणप्रक्रियेत सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 02:31 AM2020-08-18T02:31:42+5:302020-08-18T02:31:47+5:30
ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घ्यावा, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे.
मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शासनाने काही निर्णय घेतला असून त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. कोविडसंदर्भातील कामकाजातून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून कार्यमुक्त करावे. तसेच कोणत्याही आस्थापनेवरील अतिरिक्त शिक्षकांना, समायोजन न झालेल्या शिक्षकांना ते राहत असलेल्या ठिकाणी जवळच्या शाळेत बोलावून आॅनलाइन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घ्यावा, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे.
रात्रशाळेत अतिरिक्त शिक्षक पाठवावेत
न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार रात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत दुबार सेवेत असलेल्या लोकांना मुक्त केले आहे. नवीन भरतीप्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी पात्रताधारक असलेले ६००हून अधिक दिवसा शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकातून काही शिक्षक रात्रशाळेत पाठवले असून, त्यांचे मूळ वेतन त्यांच्या शाळेतून सुरू आहे. रात्रशाळेत लगेचच भरतीप्रक्रिया होणार नाही आणि दुबार काम करणारे(दिवस शाळेत काम करून पुन्हा रात्रशाळेत काम करणारे शिक्षक कार्यमुक्त आहेत)सोमवारी शासनाने काढलेल्या पत्राने शिक्षकांमध्ये व रात्रशाळाचालक, मुख्याध्यापक यांच्यामध्ये संभ्रम वाढला असून, रात्रशाळेतील शिक्षक काढून मूळ आस्थापनेत पाठवणार का? मग रात्रशाळेत लगेच भरती होणार का? तेथील जागा रिक्त राहणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
सद्यस्थितीत रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचेही आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे अशा सोमवारच्या परिपत्रकानुसार रात्रशाळेतून शिक्षक काढून घेऊ नये व रिक्त असलेल्या तुरळक ठिकाणी तातडीने अतिरिक्त शिक्षक पाठवावे किंवा भरती करावी, अशी विनंती रात्रशाळा राज्य संयोजक निरंजन गिरी यांनी केली आहे.