मुंबईत अतिरिक्त पाणीकपात ?

By admin | Published: March 26, 2016 02:39 AM2016-03-26T02:39:01+5:302016-03-26T02:39:01+5:30

मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत असलेल्या भातसा धरणातून दररोज ५० दशलक्ष लीटर पाणी ठाणे जिल्ह्याकडे वळविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे़ मुंबईच्या

Additional water fall in Mumbai? | मुंबईत अतिरिक्त पाणीकपात ?

मुंबईत अतिरिक्त पाणीकपात ?

Next

- शेफाली परब-पंडित,  मुंबई

मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत असलेल्या भातसा धरणातून दररोज ५० दशलक्ष लीटर पाणी ठाणे जिल्ह्याकडे वळविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे़ मुंबईच्या कोट्यातून हा जलसाठा वळता केल्यास गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात आणखी कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़
मुंबईला मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या सात धरणांमधून दररोज पाणीपुरवठा केला जातो़ यापैकी मुंबईचा ५० टक्क्यांहून अधिक पाणीपुरवठा भातसा व अप्पर वैतरणा धरणावर अवलंबून असतो़ गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे जलसाठा मर्यादित असल्याने पालिकेने आॅगस्ट २०१५ पासून पाणीपुरवठ्याच्या वेळेत २० टक्के व पुरवठ्यात १५ टक्के कपात केली आहे़
ही कपात पावसाळा सुरू होऊन धरणांमध्ये जलसाठ्याची स्थिती समाधानकारक होईपर्यंत राहणार आहे़ ठाणे जिल्ह्यातही पाणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे़ मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ठाण्यात असल्याने येथील जलसाठ्यावर ठाणे जिल्ह्यातूनही दावा होऊ लागला आहे़ याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे झालेल्या बैठकीत भातसा धरणातून ५० दशलक्ष लीटर प्रतिदिन जलसाठा ठाणे जिल्ह्याला देण्याचा निर्णय झाला आहे़

१३४ दिवस पाणी हवे
जुलै २०१६ पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा विचार करता अजून १३४ दिवस पाणी मुंबईला लागणार आहे. त्यात वैतरणामध्ये १०९ दिवसांचा तर भातसामध्ये ९३ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

पाणीचोरी आणि पाणीगळती
धरणांमध्ये असलेला जलसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल, असा पालिकेचा अंदाज आहे़ मात्र पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी आणि गळतीमुळे पाणीसाठा घटत आहे़ त्यातच मुंबईच्या कोट्यातून दररोज ५० दशलक्ष लीटर जलसाठा ठाण्याकडे वळविण्यात आल्यास याचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता पालिकेतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली़

अधिकाऱ्यांची सावध भूमिका
याबाबत जल अभियंता खात्याचे प्रमुख अधिकारी ए़ तवाडिया यांना विचारले असता, अद्याप असे आदेश आलेले नाहीत़ तसेच मुंबईच्या कोट्यातून ५० दशलक्ष लीटर जलसाठा वळविण्यास सांगितले आहे का, हे बघावे लागेल, असे त्यांनी सांगितले़

मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ यापैकी २५ टक्के म्हणजे ७०० ते ८०० दशलक्ष लीटर पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे़ त्यातच पाणीकपातीमुळे मुंबईकरांच्या घागरीत कमीच पाणी पडत आहे़
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी धरणांमध्ये एकूण १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा १ आॅक्टोबर रोजी असणे अपेक्षित होते़ मात्र अपुऱ्या पावसामुळे दोन ते तीन लाख दशलक्ष लीटर जलसाठा कमी पडला़ यामुळे आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे़

Web Title: Additional water fall in Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.