मुंबई : कडक उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांची पाण्याची तहान भागविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जादा पाण्याचा पुरवठा करण्यात अला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकावर जादा पाण्याच्या बाटल्या (रेल नीर) प्रवाशांच्या सोयीसाठी पुरविल्या जात आहेत. त्यानुसार दररोज एकूण दीड लाख पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा उपनगरीय रेल्वे प्रवासी आणि लांब पल्ल्यांच्या मेल, एक्स्प्रेसच्या प्रवाशांना करण्यात येत आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने उन्हाळ्यात जास्त पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात येत आहेत. प्रत्येक स्थानकावर थंडगार पाणी माफक दरात प्रवाशांना देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे प्रवाशांना पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यामुळे इतर हंगामापेक्षा उन्हाळ्यात जास्त बाटल्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर दिल्या जात असल्याचे आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंबरनाथ येथील पाण्याच्या बाटल्या (रेल नीर) तयार करण्याचा प्रकल्प आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना अंबरनाथ येथून पाण्याचा पुरवठा केला जातो. दरदिवशी एकूण दीड लाख पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर केला जातो.नुकताच गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे पाण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यासह नागपूर, भुसावळ आणि मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथे प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.वॉटर व्हेंडिंंग मशीन बंद?मध्य आणि हार्बर रेल्वेच्या स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात या मशीनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र काही रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे माफक दरात प्रवाशांना थंडगार पाणी मिळत नाही, अशी तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. काही स्थानकांवरील मशीनवर कर्मचारी असून त्यांच्याद्वारे पाणी दिले जाते. मात्र काही मशीनवर कोणतेही कर्मचारी दिसून येत नाहीत.च्अडगळीच्या ठिकाणी मशीन असल्याने त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे प्रवाशांना वॉटर व्हेंडिंग मशीनद्वारे थंडगार पाणी मिळत नाही. आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, वॉटर व्हेंडिंग मशीन २४ तास सुरू असतात.च्काही वेळा या मशीनवर कर्मचारी नसतात. अशा वेळी या मशीन ‘आॅटो मोड’वर ठेवण्यात येतात. या वेळीही या मशीनचा वापर होऊ शकतो. प्रवासी मशीनमधील पैसे टाकण्याच्या रकान्यामध्ये पैसे टाकून पाणी मिळवू शकतात.