Join us

मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण; अनेक पदे रिक्त, भरती नाही

By जयंत होवाळ | Published: June 10, 2024 9:11 PM

सुरक्षा रक्षकांची १९८४, तर उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त

मुंबई : मुंबई महापालिकेतील सुरक्षा रक्षकांची १९८४ पदे रिक्त असून, उपप्रमुख सुरक्षा अधिकारी संवर्गातील पाच पदे रिकामी आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत सुरक्षारक्षकांवर आणि अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने ही पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियन आणि ऑफिसर्स असोसिएशनने केली आहे.

उपप्रमुख सुरक्षा अधिकारी संवर्गात १२ पदे असून, त्यापैकी पाच पदे रिक्त आहेत. विभागीय सुरक्षा अधिकाऱ्यांची १८ पदे असून, त्यापैकी चार पदे, सहायक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ६६ पदांपैकी ५५ पदे रिक्त आहेत, याकडे ऑफिसर्स असोसिएशनने आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. सहायक सुरक्षा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकरिता अर्हतेमध्ये सुधारणा करण्यासाठी गेल्यावर्षी बैठक झाली होती. या बैठकीत प्रस्तावित अर्हतेस मान्यता देण्यात आली. तरीही रिक्त पदे भरली गेली नाहीत.

विभागीय सुरक्षा अधिकारी आणि उपप्रमुख सुरक्षा अधिकारी संवर्गाची अर्हता प्राप्त करणारे अधिकारी आहेत. त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या अधिकाऱ्यांना स्वतःचे काम सांभाळून आणखी तीन ते चार विभागाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे, असे युनियनने आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

१५० जण आपत्ती प्रतिसाद पथकात

सुरक्षा रक्षकांच्या पदाच्या बाबतीतही असेच आहे. त्यांची एकूण ३८०९ पदे असून, त्यांपैकी १९८४ पदे रिक्त आहेत. सुमारे १५० सुरक्षा रक्षकांना शहर आपत्ती प्रतिसाद पथकात कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिक्त पदांमुळे त्यांच्यावरही कामाचा ताण आहे. सुरक्षा चौक्या आणि पहाऱ्याची ठिकाणे सुरक्षेविना ठेवता येत नसल्याने या सुरक्षा रक्षकांना सलग दोन ते तीन पाळ्यांमध्ये राबवून घेतले जात आहे, असे म्युनिसिपल युनियनचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका