वनविभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा मार्गी लावा, आमदार प्रकाश सुर्वे यांची वनमंत्र्यांकडे मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: June 29, 2023 01:11 PM2023-06-29T13:11:05+5:302023-06-29T13:11:28+5:30
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहून समस्या मांडल्या.
मुंबई - मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत वनविभागातील नागरिकांच्या समस्या आणि मूलभूत गरजा सोडवा, अशी आग्रही मागणी त्यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहून समस्या मांडल्या. तसेच सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तेथील नागरिकांचे पुर्वसन त्याच ठिकाणच्या लगतच सुरू असलेल्या एस.आर.ए च्या माध्यमातून करण्यात यावे किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर आणि दहिसर येथील नागरिकांचे दहिसर ऑक्ट्रोयनाका (चेकनाका ) येथे करावे, असा प्रस्ताव मांडला.
गेली चाळीस ते पन्नास वर्षे वास्तव्याला असलेले नागरिक त्याच ठिकाणी राहून उदरनिर्वाहासाठी लहान मोठी नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू विकण्यासाठी व्यवसाय करत असून त्यांना एक पर्यायी मार्ग द्यावा व निकाल होईपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये, अशी विनंती देखिल आमदार प्रकाश सुर्वे यांनी यावेळी केली.
यावेळी वन विभागाचे सचिव रेड्डी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन, रेवती कुलकर्णी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ ७ च्या उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे ,आर/मध्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील बेंद्रे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.