\Sप्लाझ्माचा साठा पुरेसा !
महापालिका रुग्णालय प्रशासनाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये प्लाझ्माचा साठा पुरेसा असल्याची माहिती महापालिका रुग्णालय प्रशासनांनी दिली. दिवाळीनंतर राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, असा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागासह पालिका यंत्रणाही सज्ज आहे.
मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात आयसीएमआर आणि राज्य शासनाच्या प्लॅटिना उपक्रमांतर्गत
प्लाझा उपचारपद्धती रुग्णांवर करण्यात आल्या. मात्र गंभीर रुग्णांवर ही अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले नाही, असे तज्ज्ञांचे निरीक्षण असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. प्लाझ्मा दानाविषयी आवश्यकता असल्यास त्यासाठी डॉक्टरांकडून पत्र लागते, त्यानंतर टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या परवानगीनंतर हा साठा पुरविण्यात येतो.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध आहे. त्यासाठी केईएम रुग्णालयात अशा स्वरूपात प्लाझ्मा बँक कऱण्याचाही मानस असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठीक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते. रक्ताचा वापर करून अँटिबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरियाच्या संपर्कात येते. तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटिबॉडीज मुक्त होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये अँटिबॉडीज असतात. प्लाझ्मामध्ये प्रतिपिंडे म्हणजे अँटिबॉडीचे प्रमाण अधिक असल्यास रुग्णाला ते उपयुक्त ठरत असल्याचे निरीक्षण आहे. सध्या रुग्णालयात विविध रक्तगटांचा प्लाझ्मा साठा पुरेसा असून डॉक्टरांनी प्लाझ्माची गरज असल्याचे सांगितल्यास ते पुरविण्यात येते, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.