ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता संसर्ग पाहता पालिका प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा साठा कमी पडू नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. पालिका रुग्णालय, कोविड केंद्रांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी पालिकेने कृती आराखडा आखला आहे. तसेच, नुकतीच पालिकेने दोन लाख रेमडेसिविर इंजेक्शन्सची खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे, पालिकेने गुरुवारी एफडीए, ऑक्सिजन वितरकांशी बैठक घेऊन खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठीचे नियोजन केले.
मुंबईतील रुग्णालयांना सध्या २३५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत आहे. मुंबईतील वाढता संसर्ग पाहता ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबई महानगरामध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून, दोन लाख रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी नोंदविण्यात आली आहे. रुग्णशय्यांची संख्याही वाढविली जात असून, त्यामध्ये अधिकाधिक ऑक्सिजन पुरवठ्याची सोय केली जात आहे. त्यामुळे सध्या होत असलेला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्याबाबत सर्व यंत्रणांनी आवश्यक समन्वय राखणे गरजेचे असल्याचे काकाणी यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे, ऑक्सिजनचा वापर योग्य दृष्टिकोनातून व्हावा तसेच काटकसरीने करण्यात यावा यासाठी मनुष्यबळालाही प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. यासाठी पालिका प्रशासनाने ६४ नर्सिंग होम्सची नियुक्ती केली आहे.
* दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर
आजमितीस २० हजार बेड असून, येत्या आठवड्यात २२ हजार इतक्या होणार आहेत. मागील १५ दिवसांत मुंबईतील कोविड रुग्णांची दैनंदिन संख्या ८ ते १० हजार दरम्यान स्थिरावली असली तरी पुढील १५ दिवस आणखी महत्त्वाचे आहेत, अशी माहिती काकाणी यांनी दिली. मुंबईत येत्या दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभी राहणार आहेत. महापालिकेने पूर्व उपनगरात कांजूरमार्ग, सायन येथील सोमय्या मैदानात, पश्चिम उपनगरात मालाड येथे आणि शहरात महालक्ष्मी येथे नवीन कोरोना केंद्रे उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या चार केंद्रांमध्ये मिळून ५,३०० खाटा वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे संसर्ग नियंत्रणासाठी विविध पातळ्यांवर पालिकेकडून प्रयत्न सुरू असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
--------------