अधिकच्या साठ्यासाठी केंद्राकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड लसीकरणात १८ मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र संपूर्ण देशात जवळजवळ अव्वलस्थानी आहे. एप्रिल महिन्यापासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या टप्प्यात दिवसाला तीन लाख डोस देऊन लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनीही लसीकरणासाठी आणखी लसीचा साठा मिळावा अशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती केली. राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, राज्याला काेविशिल्डचे ९.०६ लाख डोस उपलब्ध झाले असून, ते राज्यातील विविध जिल्ह्यांना वितरित करण्यात येत आहेत.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत कोविशिल्ड लसीचे २ लाख डोस असून कोव्हॅक्सिन लसीचे सुमारे १ लाख डोस आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या नव्या टप्प्यात लसीचे डोस कमी पडणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार असून केंद्राकडे डोस वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.