मुंबई : राज्यासह मुंबई दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांकडून विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासनाने याविषयी खबरदारी बाळगत खाटांची उपलब्धता, चाचण्यांची क्षमता वाढविली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे संक्रमण वाढल्यास औषध व ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली.
सध्या राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असून रेमडेसिवीर, टॉसिलीझूमॅबसारखी औषधेही मुबलक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये दिवसाला १८ ते २३ हजारांच्या घरात रुग्ण आढळत होते. या काळात सक्रिय, गंभीर रुग्णांची संख्या वाढली. मोठ्या संख्येने रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू लागली. दिवसाला ४०० ते ५०० टन ऑक्सिजनची गरज भासत असताना सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ती ८५० टनांवर गेली होती.ऑक्सिजनची गरज ओळखून ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे प्रमाण बदलले. आता ते २०-८० टक्के असे आहे. औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजन तर ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी वापरण्यात येईल.
राज्यात दिवसाला लागतो ४५० टन ऑक्सिजनअन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले, सध्या राज्यात औषध व ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास तुटवडा भासणार नाही. आजच्या घडीला राज्यात दिवसाला ४५० टन ऑक्सिजन लागत असून सद्या ४०००हून अधिक टन ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन कमी पडणार नाही.