भावोजींना डबल संधी, सिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी 'पुनश्च आदेश बांदेकर'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 03:41 PM2020-07-24T15:41:05+5:302020-07-24T15:41:17+5:30
बांदेकर यांच्याकडे २४ जुलै 2017 रोजी सर्वप्रथम या ट्रस्टचे अध्यक्ष बनले होते, पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 24 जुलै 2020 पर्यंत ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद राहणार होते.
मुंबई - महाराष्ट्राचे लाडके भावोजी आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची पुन्हा एकदा प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी 2017 मध्ये त्यांनी हा पदभार स्वीकारला होता. राज्य सरकारने या संदर्भात अधिसूचनेद्वारे घोषणा केली होती. त्यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदासाठी बांदेकर यांचे नाव सुचवले होते.
बांदेकर यांच्याकडे २४ जुलै 2017 रोजी सर्वप्रथम या ट्रस्टचे अध्यक्ष बनले होते, पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 24 जुलै 2020 पर्यंत ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद राहणार होते. मात्र, आज पुन्हा नव्याने त्यांची निवड करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कुठल्याही संस्था, संघटनांच्या निवडणुकी होत नाहीत. तर, मंदिर आणि देवस्थानही बंद आहेत. त्यामुळे, आदेश बांदेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या मंदिराच्या रांगेत उभे राहायचो, तिथे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मोठी जबाबदारी मिळाली आहे. भाविक आणि देवाचीही सेवा करायला मिळणार असल्याने मी ही जबाबदारी स्वीकारली, असे त्यांनी यापूर्वी पहिल्यांदा निवड झाल्यानंतर म्हटले होते. त्यामुळे यावेळीही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्यामुळेच पुनश्च अध्यक्ष बनले आहेत.