मुंबई - नवीन वर्षात नवनवीन नाटके मराठी रसिकांच्या भेटीला येत आहेत. रहस्यमय नाटकांचे दिग्दर्शन करण्यात हातखंडा असलेले विजय केंकरे दिग्दर्शित 'माईंड गेम' या आगामी नाटकासाठी अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे ही जोडी रंगभूमीवर तिसऱ्यांदा एकत्र आली आहे.
अस्मय थिएटर्सचे 'मास्टर माईंड' हे रहस्यमय नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. सध्या या नाटकाची तालिम जोरात सुरू आहे. या नाटकात आस्ताद काळे व अदिती सारंगधर हे कलावंत मुख्य भूमिका साकारत आहेत. आस्तादसोबत तिसऱ्यांदा नाटकात एकत्र काम करण्याबाबत 'लोकमत'शी बोलताना अदिती म्हणाली की, 'प्रपोजल', 'चर्चा तर होणारच' आणि आता 'मास्टर माईंड' या नाटकात पुन्हा आस्तादसोबत काम करत आहे. तिन्ही नाटकांमध्ये आम्हा दोघांच्याही व्यक्तिरेखा खूप वेगळ्या आहेत. दोघेही छान मित्र असल्याने आस्तादच्या अॅक्शनवर रिअॅक्शन देणे खूप सोपे जाते. नाटकाची तालिम आणि प्रयोगासाठी लागणारे तास वगळता नाटकासाठी खूप मोठी कमिटमेंट करावी लागत नाही. हि कमिटमेंट देणे सध्या शक्य असल्याने पुन्हा नाटक करत आहे. नाटक करताना कलाकार म्हणून स्वत:ला पैलू पाहण्याची एक संधी मिळते. 'माईंड गेम'च्या निमित्ताने प्रथमच थ्रिलरचा अनुभव घेणार आहे. थ्रिलरची जी वेगळी गणितं असतात त्याचे आराखडे बांधण्याचे काम करत आहे. यात विजय केंकरे मास्टर असल्याने हे नाटक स्वीकरल्याचे अदिती म्हणाली.
अदितीप्रमाणेच आस्तादचेही हे पहिलेच थ्रिलर नाटक आहे. याबाबत तो म्हणाला की, 'प्रपोजल' नाटकावेळी सर्वांना सोबत घेऊन जाणारा अदितीचा स्वभाव भावला. त्यामुळे या नाटकात ती असल्याने मी खूपच कम्फर्ट झालो होतो. सहकलाकार म्हणून ती उत्तम आहेच, पण माणसाला माणूस म्हणून वागवणारी आहे. दोन मालिका आणि तीन नाटकांमध्ये आम्ही एकत्र काम केल्याने आमच्यात कम्फर्ट झोन आहे. विजय केंकरे यांनी विश्वास दाखवल्याने पुन्हा दोघे एकत्र येऊ शकल्याचेही आस्ताद म्हणाला.
या नाटकाचा 'मास्टर माईंड' लेखक प्रकाश बोर्डवेकर असल्याचे सांगत विजय केंकरे म्हणाले की, हे नाटक अखेरपर्यंत रसिकांना विचार करायला लावणारे आहे. नाटक पाहताना रसिकांची अवस्था दोलायमान होईल. हत्या कोणी केली यावर हे नाटक नसून, समोर दिसणाऱ्या व्यक्तिरेखा गुन्हेगार आहेत की, अन्य तिसरा कोणी 'मास्टर माईंड' आहे याचा विचार करायला लावेल. अशा व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अदिती आणि आस्तादसारख्या मुरलेल्या कलाकारांची निवड केली.