मुंबई- मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यावरुन, आता शिवसेना नेते जहाल भूमिका घेताना दिसत आहेत. मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार निशाणा साधला. शिवसेनेतून आता घाण निघून गेली, आता संगळं चांगलंच होणार असं ते म्हणाले. त्यानंतर, संजय राऊतांनीही, बंडखोर आमदारांना 100 बाप असल्याची घणाघाती टिका केली होती. तर, दुसरीकडे रश्मी ठाकरे याही मैदानात उतरल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संयमाने आमदारांची मने वळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. रश्मी ठाकरे आता बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवत आहेत. त्याचवेळी, उद्धव ठाकरे हे गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचाही प्रयत्न करत आहेत. यापूर्वीही रश्मी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन संवाद साधत त्यांना पुन्हा मुंबईत येण्याचे आवाहन केले होते.
रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधत असून आमदारपत्नींनी त्यांच्या पतीसोबत बोलावे, असे त्यांनी सूचवले आहे. तर, उद्धव ठाकरे हेही बंडखोर आमदारांसोबत संपर्कात आहेत, ते मेसेजद्वारे संवाद साधत असल्याची माहिती आहे. त्यातच, गुवाहटीतील अनेक बंडखोर आमदार शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे, हे बंड मोडित निघणार का, याची चर्चा रंगली आहे.
आम्ही त्यांना काय कमी केलं - आदित्य
गेले अनेक वर्ष आपण शिवसेना म्हणून एकत्र आहोत, कोणाचा डोळा असला तरी मुंबईला कोणाची नजर लागू दिली नाही. ज्यांनी सभागृहात ताकद दाखवली ते आज आमच्यासोबत आहेत. गेले दोन चार दिवस जे वातावरण आहे, त्यावरून एकच दिसतंय आता घाण निघून गेली, जे काही व्हायचं ते चांगलंच होणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले. एकाच गोष्टीचं मला आश्चर्य होतं, राजकारण म्हटल्यावर लोकं कसं बदलू शकतात हे पाहिलंच आहे. पण हाच प्रश्न येतो आम्ही यांना काय कमी दिलं. कालही माझ्याकडे अनेक लोकं आले त्यांनी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही असं सांगितल्याचंही ते म्हणाले.
विधानभवनाकडचे रस्ते वरळीतूनच जातात
सचिन भाऊ तुम्ही फ्लोअर टेस्ट बद्दल सांगितलंय. ज्या दिवशी ते मुंबईत उतरतील, एअरपोर्टकडून विधानभवनाकडे जाण्याचे रस्ते वरळीतून, नाहीतर आपल्या परळ मधून आहेत. तिसरा रस्ता आपल्या भायखळ्यातून आहे आणि येणारा आपल्या वांद्र्यामधून असं सूचक वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं.