मुंबई - मराठीतील 'सैराट' सिनेमाचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित हिंदी रिमेक 'धडक' सिनेमाचा झिंगाट ट्रेलर सोमवारी (11 जून) रिलीज झाला. या सिनेमामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरचा छोटा भाऊ इशान खट्टरची प्रमुख भूमिका आहे. येत्या 20 जुलैला धडक सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 'सैराट' सिनेमामध्ये रिंकू राजगुरू (आर्ची) आणि आकाश ठोसर (परशा) यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या दोघांच्या दमदार अभिनयामुळे सिनेमा सुपरडुपर हिट झाला. मात्र या दोघांव्यतिरिक्त 'प्रिन्स दादा' हे पात्रदेखील तितकंच गाजलं होतं. त्यामुळे आता 'धडक' सिनेमामध्ये 'प्रिन्स दादा'ची भूमिका कोण साकारणार?, ही भूमिका तितकीच गाजणार का?, याबाबतची उत्सुकता सिनेरसिकांमध्ये पाहायला मिळत आहे.
(Dhadak Trailer : जान्हवी-इशानच्या 'धडक'चा ट्रेलर पाहून काय म्हणाले प्रेक्षक?)
तर तुमची उत्सुकता अधिक ताणून न ठेवता प्रिन्स दादाचं पात्र नेमकं कोण साकारणार आहे, याची माहिती तुम्हाला देत आहोत. दुसरे-तिसरे कोणी नाही तर 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता आदित्य कुमार 'प्रिन्स दादा'च्या भूमिकेत दिसणार आहे. 2012 मध्ये आलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर-2'मधील आदित्यनं साकारलेला बेभान आणि बिनधास्त पर्पेंडिक्युलरची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिलीय. केरी ऑन कुत्तों(2015), बॅन्जो (2016) या सिनेमांमध्येही आदित्य कुमारनं काम केले आहे.
दरम्यान, 'सैराट'मध्ये सुरज पवारनं प्रिन्स दादाची भूमिका साकारली होती. जबरदस्त व दमदार खलनायक सुरज पवारनं मोठ्या पडद्यावर साकारला होता. त्यामुळे 'धडक' सिनेमामध्ये आदित्य कुमारदेखील तितकाच आक्रमक 'प्रिन्स दादा' साकारणार का?, याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. याचं उत्तर मिळवण्यासाठी प्रेक्षकांना 20 जुलैपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.