मुंबई : बलात्कार प्रकरणी बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोली याचा अटकपूर्व जामीन दिंडोशी सत्र न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला.बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने आदित्य पांचोलीविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराची व ब्लॅकमेलिंगची तक्रार नोंदविली. पोलिसांनी पांचोलीवर भारतीय दंडसंहिता ३७६ (बलात्कार), ३२८ (विष देऊन दुखापत करण्याचा प्रयत्न करणे), ३८४ (खंडणी मागणे) अणि अन्य काही कलमांखाली गुन्हा नोंदविला.या प्रकरणी आपल्याला अटक होईल, या भीतीने पांचोलीने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. गेल्या वर्षी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने आदित्य पांचोलीबरोबर करिअरच्या सुरुवातीस आपले प्रेमप्रकरण सुरू होते, अशी ग्वाही दिली. तिने या प्रेमप्रकरणाची माहिती दिल्यानंतर याबाबतच्या चर्चादेखील बऱ्याच रंगल्या होत्या.आदित्य पांचोलीने आपल्यावर जबरदस्ती केली व आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचेही या वेळी सांगितले. याबाबत आदित्यची पत्नी झरीना वहाब हिच्याकडे तक्रार केली. मात्र, तिने मदत करण्यास नकार दिला, असेही कंगणाने याबाबत दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. आदित्य पांचोलीने २०१४ मध्ये आपले खासगी फोटो काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
आदित्य पांचोलीचा अटकपूर्व जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 3:44 AM