मुंबई : ‘एचडीएफसी’ या भारतातील सर्वांत मोठ्या खासगी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी सन २०१९-२० या वित्तीय वर्षात बँकेकडून पगार व अन्य लाभांच्या रूपाने १८.९२ कोटी रुपयांची कमाई केली असून, अशा प्रकारे त्या वर्षातील देशातील सर्वाधिक कमाई करणारे ते ‘बँकर’ ठरले आहेत.
एचडीएफसी बँकेच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या वर्षात बँकेने पुरी यांना जो ‘स्टॉक आॅप्शन’ (म्हणजे बँकेचे शेअर) दिला त्यातून त्यांना आणखी १६१.५६ कोटी रुपयांचा लाभ झाला. त्याआधीच्या वर्षी पुरी यांनी ‘स्टॉक आॅप्शन’मधून ४२.२० कोटी रुपयांची कमाई केली होती.
वयाची ७० वर्षे पूर्ण झाल्यावर पुरी येत्या आॅक्टोबरमध्ये बँकेतून निवृत्त होतील. गेल्या २५ वर्षांच्या सेवेत ‘एचडीएफसी’ बँकेच्या भरभराटीत पुरी यांचा सिंहाचा वाटा आहे. मालमत्ता व बाजारमूल्य या दोन्ही दृष्टीने ही बँक आज देशातील सर्वांत मोठी खासगी बँक आहे.पुरी निवृत्त झाल्यावर त्यांची जागा शशिधर जगदीशन घेतील, अशी अपेक्षा आहे. ते बँकेत सध्या ग्रुप हेड व चेंज एजंट आहेत. त्यांना मावळत्या वर्षात बँकेकडून २.९१ कोटी रुपये पगारापोटी मिळाले, असेही हा अहवाल सांगतो.
संदीप बक्षी दुसऱ्या क्रमांकावर
या तुलनेत आयसीआयसीआय या दुसºया क्रमांकाच्या खासगी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बक्षी यांनी ६.३१ कोटी रुपयांची कमाई केली, असे त्या बँकेचा वार्षिक अहवाल सांगतो. बक्षी आॅक्टोबर २०१८ मध्ये या पदावर आले. त्यामुळे त्यांचा हा पगार तेव्हापासूनचा आहे.