मुंबई: सत्ता आल्यावर आरेतील झाडांच्या मारेकऱ्यांवर योग्य ती कारवाई करू, आरेला जंगल घोषित करू, अशी आश्वासनं देणाऱ्या शिवसेनेला नेटकऱ्यांनी त्यांच्या या विधानांची आठवण करून दिली आहे. जनतेनं पुन्हा एकदा सत्ता दिली आहे. आता आरे प्रकरणी तातडीनं योग्य पावलं उचला आणि दिलेलं वचन पाळा, अशी मागणी ट्विटरवर अनेकांनी केली आहे. त्यामुळे #AadityaTeraWada हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. 4 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयानं आरेतील झाडं मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावित कारशेडसाठी कापण्याची परवानगी दिली. त्यानंतर लगेचच रात्री आरेमधील झाडं कापण्यास सुरुवात झाली. शिवसेनेचा आरेतील झाडांच्या कत्तलीला विरोध असल्यानं हा विषय पेटला. शिवसेना सत्तेत आल्यावर झाडांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करू, आरेला जंगल घोषित करू, अशी आश्वासनं शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरेंनी दिली. याशिवाय आरेतील वृक्षांच्या कत्तलीविरोधात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी ट्विट्सदेखील केली. आता आदित्य विधानसभेत जाणार असल्यानं आणि त्यांची सत्तादेखील आल्यानं अनेकांनी त्यांना आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. आरेतील वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका 4 ऑक्टोबरला फेटाळण्यात आल्या. यानंतर त्याच रात्री आरेमध्ये झाडं कापण्यात आली. या वृक्षतोडीला शिवसेनेनं विरोध केला. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. न्यायालयानं आरेतील वृक्षतोडी स्थगिती दिली. मात्र प्रकल्पासाठी आवश्यक झाडं कापून झाल्याची माहिती सरकारकडून न्यायलयाला देण्यात आली. काही दिवसांपूर्वी न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारला दिलासा मिळाला. पुढील आदेशापर्यंत आरेतील एकही झाडं कापू नका. मात्र कारशेडचं काम सुरू ठेवा, असं न्यायालयानं सांगितलं.