Aditya Thackeray: तिरुपती बालाजी मंदिरासाठी 500 कोटींची जागा, आदित्य ठाकरेंनी सोपवलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 06:06 PM2022-05-01T18:06:00+5:302022-05-01T18:21:07+5:30
तिरुपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती.
मुंबई - महाराष्ट्रातील ज्या भक्तांना आंध्र प्रदेशमध्ये जाऊन तिरुमला तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी नवी मुंबईत भव्य दिव्य असं तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या आंतरावर उलवे इथे दहा एकर जागेवर हे मंदिर साकारण्यात येत असून देवस्थान ट्रस्टला 10 एकर जागा महाराष्ट्र सरकारने देऊ केली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी तिरुपती देवस्थानला भेट दिली. त्यावेळी, यासंदर्भातील कागदपत्रेही सोपवली.
तिरुपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. यावर सकारात्मक भूमिका घेत सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यानंतर, नवी मुंबईत प्रति तिरुपती बालाजी मंदिरासाठी 10 एकर जागा अर्पण करण्यात आली आहे. शनिवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी तिरुपतीला बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी, तिरुपती तिरुमला देवस्थानमचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांच्याकडे जमिनीसंदर्भातील कागदपत्रे दिली. व्यंकटेश्वराच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालं, जमिन देण्यासंदर्भातील अधिकृत पत्र देताना मला आनंद होत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. तसेच, याचा फोटोही शेअर केला आहे.
It was my greatest honour to humbly hand over the official letter of allotment of land for the Lord Venkateswara Temple (Tirupati) in Maharashtra to the Chairman of @TTDevasthanams, @yvsubbareddymp ji.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 30, 2022
This was only possible with the blessings of Lord Sri Venkateswara. pic.twitter.com/RZpNiGgdPT
नवी मुंबईतील या जागेची बाजार भावानुसार किंमत 500 कोटी असल्याचे समजते. तर, रेमंड ग्रुपच्यावतीने या जागेत मंदिर बांधण्यासाठीचा सर्वच म्हणजे अंदाजे 60 कोटी रुपये खर्च करण्याची इच्छा दर्शवल्याचे सुब्बा रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. लवकरच, जम्मूतील तिरुपती बालाजी मंदिराचे बांधकाम पूर्ण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ठरलं
मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (2 एप्रिल) सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत तिरुमला तिरुपती देवस्थानमला या मंदिरासाठी जमीन देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी आणि मंत्री अदित्य ठाकरे हे या बैठकीत उपस्थित होते. 27 फेब्रुवारी 2022 रोजी तिरुपती तिरुमला देवस्थानमचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी जमीन वाटपासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंदिरासाठी सिडकोला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ योग्य जागा शोधण्याचे निर्देश दिले होते. जमिनीच्या वाटपाला तत्वतः मान्यता दिल्यानंतर सुब्बा रेड्डी यांच्यासह अतिरिक्त मुख्य अधिकारी धर्मा रेड्डी, विश्वस्त मिलिंद नार्वेकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी भेट देऊन जागेची पाहणी केली होती.
दरम्यान, यंदा तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराच्या विश्वस्तपदी महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आणि विश्वासू नार्वेकरांना ही संधी मिळताच, त्यांनी आता महाराष्ट्रात तिरुमला तिरुपती मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे.