Aditya Thackeray: आदित्य ठाकरे एकाच वाक्यात बोलले, कसब्यातील विजयानंतर सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:12 PM2023-03-02T13:12:09+5:302023-03-02T13:19:24+5:30
रविंद्र धंगेकर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडत आहे.
मुंबई/ पुणे - कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. धंगेकर यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्यांनी रविंद्र धंगेकरांचं अभिनंदन केलंय. तर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही धंगेकर हा जमिनीवर राहून काम करणारा नेता आहे, दैनिक लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा कार्यकर्ता आहे, येथील उमेदवाराची योग्य निवड केल्यानेच हा महाविकास आघाडीचा विजय झाल्याचे पवार यांनी म्हटलं. दरम्यान, कसबा पेठेतील विजयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिलीय.
रविंद्र धंगेकर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडत आहे. जनतेने त्यांना स्विकारलं नाही. आशीर्वाद घेणे ही परंपरा आहे. त्यामुळे मी १०० टक्के गिरीश बापट यांना भेटायला जाणार आहे. ५० खोके एकदम ओके हे फक्त इथेच नाही तर महाराष्ट्रात दिसतंय. आणि हे परिवर्तन राज्यभर होणार आहे. शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर असल्याचं देखील रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं. तर, धंगेकर यांच्यासाठी कसबा पेठ मतदारसंघात रोड शो घेणाऱ्या आदित्य ठाकरेंनीही या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरेंनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली. कसब्यातील विजयाचं वातावरण हे महाराष्ट्रात आणि देशात कायम राहिल, असे त्यांनी म्हटलं. दरम्यान कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. या मतमोजणीत रविंद्र धंगेकरांचा विजय निश्चित झाला आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार रविंद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत होती. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला होता.
कोण आहेत रविंद्र धंगेकर?
रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख राहिली आहे. मनसेमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. इथंच त्यांची राजकीय कारकीर्द फुलली. ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. याकाळात त्यांनी कसब्यामध्ये बरीचं विकासकामं केली.