मुंबईतील रस्त्यांचा मुद्दा पेटला; आदित्य ठाकरे- आशिष शेलार यांच्यात खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 01:25 PM2023-03-13T13:25:44+5:302023-03-13T13:26:20+5:30
जिथं घोटाळ्याचे लांगुनचलन होतेय त्यातील कुठल्याही कंपनीला काम मिळाले नाही ही खरी पोटदुखी आहे असा आरोप शेलारांनी केला.
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात विधानसभेत मुंबईच्या प्रश्नावर आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळाले. मुंबईत ४०० किमी रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे होणार असून त्यावर ६०८० कोटी खर्च होणार आहेत. हे काम पावसाच्या आधी सुरू होणार संपणार आहे का? ही कामे सुरू झालीत नाही आगाऊ रक्कम देण्यात येऊ नये अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी सभागृहात केली.
आदित्य ठाकरे यांनी सभागृहात रस्ते आणि पर्यावरण याविषयावर भाष्य केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, माहूलचा विषय मुंबईसाठी गंभीर आहे. २ हजार माहूलकरांना तेथून स्थलांतरीत केले. औद्योगिक कंपन्यांमधून होणारे प्रदुषणामुळे तेथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले. या केंद्रीय कंपन्या आहेत त्याला राज्य पर्यावरण मंत्रालयाला हटवण्याचे अधिकार नाहीत. आम्ही त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्याचसोबत मुंबईतील रस्त्यांबाबत प्रश्न गंभीर आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मुंबईतील रस्त्यांवर जिथे जिथे काम सुरू असतील. तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि अपडेट्स दिले जातील असे सांगण्यात आले. परंतु अद्याप ते सुरू झाले नाही. ते कधीपासून सुरू होणार असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत सरकारला विचारला. त्यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उभं राहून या विषयांवर चर्चा करायला मी तयार आहे. ही चर्चा घेतली पाहिजे. आपण माहूलच्या लोकांना स्थलांतरित केले पण खासगी कंपन्यांना स्थलांतरित केले नाही. ते का केले नाही? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.
तसेच मी नॅशनल कंपन्यांबाबत बोललो नाही. खासगी कंपन्यांसोबत बैठका झाल्या की नाही? ज्याठिकाणी रस्त्यांच्या कामाबाबत जे प्रश्न उपस्थित केले जातात. कारण राष्ट्रीय कंपन्या पहिल्यांदाच महापालिकेच्या कामात आल्यात. जिथं घोटाळ्याचे लांगुनचलन होतेय त्यातील कुठल्याही कंपनीला काम मिळाले नाही ही खरी पोटदुखी आहे. भ्रष्टाचारी कंत्राटदारांना काम मिळाले नाही म्हणून हे चाललेय. गेल्या २५ वर्षातील रस्त्यांबाबत चर्चा होऊ द्या. रस्ते आणि खड्डे यावर चर्चा करू. २५ वर्षात १२ हजार कोटी जे रस्त्यावर खर्च झाले त्याची चौकशी व्हावी अशी मागणी आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.