मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.
आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही सर्व ६३ आमदारांनी राज्यापालांची भेट घेतली. राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपाल हे राज्याचे पालक असून संकटात सापडलेल्या शेतकरी आणि मच्छीमार बांधवांना तात्काळ मदत व्हावी म्हणून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राज्यपालांशी चर्चा केली. पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हायला हवे. केंद्राकडून मदत मिळायला हवी. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणा सक्रिय व्हायला हव्यात. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्याप्रमाणे निधी दिला गेला पाहिजे, अशाप्रकारची विनंती आम्ही राज्यपालांकडे केली आहे. यावर, राज्यपालांनीही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे."
याशिवाय, शिवसेनेकडून राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “मागील काही महिन्यांमध्ये राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. अवकाळी पाऊस पडला. क्यार वादळामुळे जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे. अनेकांचा जीव गेला. 328 पाळीव प्राण्यांचाही जीव गेला. या सर्वांना शासनाची तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. राज्यातील जनतेला आधार देण्यासाठी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच राज्ययंत्रेणाला नियमांचा काथ्याकुट न करता सरसकट सर्व प्रकारची मदत तातडीने देण्याचे निर्देश द्यावेत.”
आज शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, सुनील प्रभू यांची विधानसभेतील शिवसेनेचे पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार राज्यपालांची भेट घेणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उत आला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. कारण, सत्तेतील समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.