Join us

धारावीतल्या लोकांना दुसरीकडे नेऊन पुनर्विकास कोणाचा होतोय? आदित्य ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 7:47 PM

Aaditya Thackeray : धारावीचा पुनर्विकास कोणासाठी केला जात आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Dharavi redevelopment project:धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन महाविकास आघाडीने जोरदार विरोध सुरु केला आहे. मुंबईतील मोक्याच्या जागा अदानी समूहाला देण्याचा घाट महायुतीने घातल्याचा आरोप मविआ नेत्यांकडून केला जात आहे. धारावीचा पुनर्विकास झाला पाहिजे, अदानीचा नाही असे म्हणत ठाकरे गटाने महायुती सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. अशातच धारावीचा पुनर्विकास नेमका कोणाच्या फायद्यासाठी आहे? असा सवार ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील मोक्याचा भूखंड अदानींच्या घशात टाकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांनी केला आहे. आता मुंबईतील मोक्याच्या भूखंडावरून तसेच मिठागराच्या जमिनीवरून महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. मिठागरांची २५६ एकर जमीन देण्याच्या निर्णयावर आदित्य ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल विचारला आहे. मिठागारांची जमीन केंद्रातील मोदी सरकारने लाडक्या उद्योगपतीला देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला. "मुंबईच्या पूर्व उपनगरात पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पंपिंग स्टेशनसाठी कांजूरमार्ग येथील जागा १० वर्षांसाठी महापालिकेला देण्यास केंद्र सरकारने नाकारली होती. तसेच केंद्र सरकारने प्रस्तावित कांजूरमार्ग मेट्रो डेपोविरोधात एक अनावश्यक खटला (तोही मिठागाराची जमीन असल्याचा खोटा दावा करत) दाखल केला. मात्र, मेट्रो कार डेपो स्थलांतरीत करण्याचा निर्णय झाल्यावर तो खटला नंतर मागे घेण्यात आला. हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्राच्या फायद्याचे होते. तरीही महाराष्ट्रविरोधी भाजपने ते होऊ दिले नाही," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

"आता मिठागारांची जागा बांधकाम व्यावसायिकांसाठी नो डेवलपमेंट झोन असतानाही ती जागा त्यांच्या लाडक्या बिल्डरच्या, उद्योगपतींना दिली जात आहे. विचार करा का? कारण यामुळे मुंबईचे नुकसान होणार आहे आणि हे एक असं शहर आहे जे भाजपला आवडत नाहीये. धारावीतील अपात्र रहिवाशांच्या सोसायटी मुलुंड, वडाळा आणि कांजूरमार्ग येथे येत असतील तर धारावीचा पुनर्विकास कोणासाठी केला जात आहे? त्यामुळे धारावीतील कोणत्याही रहिवाशांना अपात्र ठरवू नये. तसेच तसेच मिठागाराच्या जमीनी कोणालाही देऊ नये. मुंबई फुकटात अशा स्वार्थी घटकांच्या हाती देऊन भाजपला मुंबई तोडायची आहे," असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. 

टॅग्स :धारावीआदित्य ठाकरेभाजपा