मुंबई :
१०० वर्षांपेक्षा जुन्या पण आजही ठणठणीत अशा विन्टेज गाड्या हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा असून त्याचे जतन करण्यासाठी मुंबईत विन्टेज गाड्यांचे संग्रहालय करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या वतीने रविवारी विन्टेज गाड्यांची रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ठाकरे यांनी ही घोषणा केली.
स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईच्या रस्त्यांची शान असलेल्या १५० गाड्या रॅलीमध्ये सहभागी होत्या. कफ परेड ते वरळी सी-लिंक या मार्गावरून आयोजित रॅलीद्वारे या गाड्यांनी मुंबईच्या रस्त्यांवरून भूतकाळ जागवला. आजच्या रॅलीत १९१४ ते १९८४ या काळातील गाड्यांसह ७२ विन्टेज बाइकचाही समावेश होता. मोनीश डोसा (वोल्सले सॅटेलाईट), गौतम सिंघानिया (फ्रान्स टाईप १२ फायर ट्रक), अब्बास जसदानवाला (पीयर्स अँरो), राहुल शहा (रोल्स रॉईस २५-३०) यांच्यासह सर्वच गाड्या लक्षवेधी होत्या. आशिष दोषी यांनी त्यांच्या शेव्हर्ले कॅप्रे (१९७३) गाडीबद्दल सांगितले की, तत्कालीन गुजरातच्या गव्हर्नरची ही गाडी मी घेतली. त्या काळात ऑटोमॅटिक गिअरप्रणाली असलेली ही सर्वांत अद्ययावत गाडी होती, तर तब्बल १०० विन्टेज गाड्यांचे मालक असलेले धनंजय बदामीकर म्हणाले की, राजे-महाराजे, उद्योगपती यांनी या गाड्या अमेरिका, युरोप, फ्रान्स, जर्मनी येथून भारतात आणल्या. फियाट, रोल्स रॉईस, मर्सिडीजसारख्या गाड्यांचे क्लब प्रसिद्ध आहेत.
यावेळी वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे, अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनचे प्रेसिडेंट विवेक गोयंका, उद्योजक आनंद जैन, माणिक डावर आदींची यावेळी उपस्थिती होती.