मुंबई - युवासेना प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बीएमसी शाळेतील शिक्षिकेचा व्हिडिओ शेअर करत कौतुक केलं आहे. तसेच, बीएमसी शाळेतील मराठी शिक्षणाची ही पद्धत लवकरच महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये राबविण्यासाठी मी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेणार असल्यांचही आदित्य यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांनी आपल्या विधानभवनातील पहिल्याच भाषणात जिल्हा परिषद आणि सर्वच सरकारी शाळांमध्ये शिक्षण पद्धतीत बदल करण्याची मागणी केली होती. इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटलायजेशनवर भर देण्यात यावा, अशीही मागणी आदित्य यांनी केली होती. आता, महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य यांच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, शाळा आणि शिक्षण यावरही ते विशेष लक्ष देत असल्याचं दिसून येत आहे.
बीएमसीच्या वार्ड केई विभागातील एका सरकारी शाळेत हात स्वच्छ धुण्याबद्दल शिक्षिकाने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून आणि गाण्याच्या माध्यमातून धडा दिला. या शिक्षिकेचा प्रयोग आदित्य यांना भावला असून त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. हँड वॉशिंग टेक्निक साँग, असे म्हणत mybmcwardKE ने आपल्या ट्विटर हँडलवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये, हात धुण्यासंदर्भात शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, एक गाणं म्हणून प्रात्यक्षित केल्याचं दिसून येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचाही उत्साही प्रतिसाद दिसून येत आहे.
आईच्या हातात अंगठा, बाबांच्या हातात अंगठा,हाताला आला पैसा, पाण्यात गेला मासा... असे या गाण्याचे बोल असल्याचे ऐकू येत आहे.