शेतकरी आंदोलनावरुन सेलिब्रिटींकडून सुरू असलेल्या ट्विटरवॉर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "जगात कुणी काही ट्विट करु द्यात. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गप्प का?, प्रश्न सोडवणं ही त्यांची जबाबदारी नाहीय का?", असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते मुंबईत बोलत होते.
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील चेंबूर येथे आज मियावाकी वनउद्यानाचं उदघाटन करण्यात आलं. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन भारतातील सेलिब्रिटी आता ट्विट करु लागले आहेत. या सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह लता मंगेशकर यांच्यासारख्या मोठ्या सेलिब्रिटींनी केंद्र सरकारची बाजू घेतली आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी केंद्र सरकारच सध्याच्या परिस्थितीला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
"जगात कुणी काहीही ट्वीट करु द्यात. तो मुद्दा नाही. पण मुळात केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गप्प का आहे? दिल्लीच्या सीमेचे मी फोटो पाहिले आणि मला धक्काच बसला. दिल्लीची सीमा ही काय चीनची सीमा आहे का? शेतकऱ्यांना अडविण्यासाठी भिंती कसल्या उभारता?", असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
मुंबईत २४ ठिकाणी मियावाकी वनं बहरलीमुंबईत एकूण २४ ठिकाणी मियावाकी पद्धतीची वनं बहरली असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली. चेंबुर येथील मियावाकी वनाची पाहणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली. जपानी पद्धतीनं मुंबईत या वनांची उभारणी करण्यात आली आहे. मुंबईला ६२ हजार ३९८ झाडं प्राणवायू देण्यासाठी सज्ज असल्याचं आदित्य यांनी यावेळी सांगितलं.