Aditya Thackeray: 'निवडणूक आली की दिल्लीची आक्रमणं सुरू, पण...', आदित्य ठाकरेंची IT धाडीवर पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 11:59 AM2022-03-08T11:59:27+5:302022-03-08T12:02:06+5:30
मुंबईत आज शिवसेना नेत्यांच्या घरावर आयकर विभागाकडून धाडसत्र सुरू झालं आहे.
मुंबई-
मुंबईत आज शिवसेना नेत्यांच्या घरावर आयकर विभागाकडून धाडसत्र सुरू झालं आहे. यात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य असलेल्या राहुल कनाल यांचा समावेश आहे. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे स्थानिक शिवसेना नेते संजय कदम यांच्याही घरावर आयकर विभागानं छापा टाकला आहे. याच छापेमारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
"महाराष्ट्रावर याआधीही अशी आक्रमणं झालेली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणच आहे. जेव्हा इथं निवडणूक लागेल असं कळायला लागलं आणि महाविकास आघाडीची भीती भाजपाला वाटू लागली तेव्हापासून हे सुरू आहे. यूपी, हैदराबाद, बंगालमध्येही असंच केलेलं आता महाराष्ट्रात निवडणुका येऊ लागल्या आहेत. म्हणून येथे यांच्या कारवाया सुरू आहेत. केंद्रीय यंत्रणा या आता भाजपाच्या प्रचार यंत्रणाच झाल्या आहेत. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही", असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते विधानभवनाच्या बाहेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
दुपारी संजय राऊतांची पत्रकार परिषद
शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेआधीच सकाळपासून आयकर विभागानं धाडसत्र सुरू केल्यानं खळबळ उडाली आहे. ईडी आणि भाजपा नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत भाजपाच्या कोणत्या नेत्यांवर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कोण आहे राहुल कनाल?
राहुल कनाल हे शिवसेनेचे पदाधिकारी असून राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचे निकटवर्तीय समजले जातात. तसंच ते युवासेनाच्या कोअर टीमचे सदस्य आहेत. पालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना शिक्षण समितीही दिली होती. तसंच श्री साई बाबा संस्थानचे विश्वस्त पदही त्यांचेकडे आहे.
निलेश राणेंनी केला गंभीर आरोप
राहुल कनाल यांच्याबाबत निलेश राणे यांनी काही गंभीर आरोप केले आहे. राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडसत्राबाबत एक ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. "आदित्य ठाकरेचा पुरवठा मंत्री राहुल कनाल याच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली. राहुल कनाल या व्यक्ती बांद्रा या भागात कोणलाही विचारलं तरी कळेल याचे खरे धंदे काय. नाईटलाइफ गँग मधला हा प्रमुख, स्वत: हुक्का पार्लर चावलतो आणि त्या माध्यमातून घाणेरडे धंदे करतो", असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.