रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी काढण्यात आलेल्या नव्या निविदेवरूनही आदित्य ठाकरे यांचे शरसंधान
By जयंत होवाळ | Published: December 5, 2023 08:52 PM2023-12-05T20:52:37+5:302023-12-05T21:11:55+5:30
नव्या निविदेत कामाची किंमत कमी कशी झाली, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला .
मुंबई : शहर भागातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी काढण्यात आलेल्या नव्या निविदेवरूनही आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनावर; एकप्रकारे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शरसंधान साधले आहे. नव्या निविदेत कामाची किंमत कमी कशी झाली, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
ही किंमत आधी जास्त होती की आता कमी करण्यात आली, आता रस्त्याची कामे कमी केली का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले. पूर्वीच्या कंत्राटदाराचा मुजोरपणा आणि कामांची पद्धत पाहता पालिकेने कंत्राटदारांच्या सुरक्षा ठेवचे प्रमाण १ टक्क्यावरून १० टक्केपर्यंत वाढवावी अशी मागणी ठाकरे यांनी केली.
कंत्राटदारांना फायदा करून देण्यासाठी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे मुंबईसाठी पुढचा काळ गोंधळाचा आणि अंध:काराचा दिसत आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे द्यावीत. ज्यामुळे मुंबईची लूट थांबेल,असे आदित्य यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.