Join us

आदित्य ठाकरेंनी विधानसभा लढवावी; युवासेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:42 PM

ठाकरे घराण्यातील एकाही व्यक्तीने आजतागायत निवडणूक लढवली नसल्याचा इतिहास आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात शिवसेना-भाजपाला प्रचंड प्रमाणात यश मिळालं आहे. मुंबईतील सर्व सहा जागांवर युतीचे उमेदवार निवडून आले आहेत तर अनेक विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाल्यामुळे शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नेमकं याच वातावरणामुळे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना विधानसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला आहे. 

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या इन्स्टाग्रामला पोस्टला हीच वेळ आहे आणि हीच संधी आहे असं सांगत महाराष्ट्र वाट पाहतोय असं लिहिल्याने आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेत सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे घराण्यातील एकाही व्यक्तीने आजतागायत निवडणूक लढवली नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवावी का यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार हे पाहणे गरजेचे आहे. 

सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यात शिवसेनेला आपलं यश कायम राखण्यात यश आलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला 18 जागा जिंकण्यात यश आलं आहे. काही ठिकाणी शिवसेनेने रणनीती बदलत प्रस्थापितांना नाकारून नवीन चेहरे दिले असते तर कदाचित शिवसेनेच्या खासदारांचा आकडा वाढला असता असं चित्र होतं. शिवसेनेने मागील निवडणुकीत मिळविलेल्या जागा यंदाच्या निवडणुकीत राखल्या असल्या तरी शिवसेनेचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले. शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, अनंत गीते हे नेते पराभूत झाले. 

ठाकरे घराण्यात बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक न लढण्याची परंपरा राखली होती. निवडणूक न लढता बाळासाहेबांनी अनेकांना आमदार, खासदार, मुख्यमंत्री, लोकसभा सभापती केले मात्र या सर्वांचा रिमोट कंट्रोल मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या हाती असायचा. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली. त्यानंतर राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. राज निवडणूक लढणार यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र राज यांनी युटर्न घेत निवडणूक लढवली नाही. त्यामुळे युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते असलेले आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल.  

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाराज ठाकरेनिवडणूक