Join us  

"हा बालिशपणा..."; विधानसभेची मॅच जिंकू म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 5:47 PM

T20 World Cup : भारतीय संघाच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची मॅच महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला

Aditya Thackeray on Devendara Fadnvis : भारतीय संघाने शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत टी-२० वर्ल्डकप स्पर्धा जिंकली. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताच्या विजयानंतर देशभरात आनंदाचे वातावरण आहे. भारतीयांनी या विजयाचे रस्त्यावर उतरून जंगी सेलीब्रेशन केले. पंतप्रधान मोदींपासून जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी भारतीय संघाचे कौतुक केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भारतीय संघाचे कौतुक करताना विधानसभेची मॅच महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. यावरुन आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. या विजयानंतर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.  या विश्वचषकात भारतीय संघ अपराजित राहिली आहे. सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलने सामन्याचे चित्र फिरवले. जसप्रीत बुमराहची जबरदस्त गोलंदाजी आणि विराट कोहलीची खेळी खूप खास होती. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघाने चमकदार कामगिरी करत भारताला क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला, भारत विश्वविजेता ठरला. मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीबाबतही महत्त्वाचे विधान केलं.  "विधानसभेचा आमचा खेळही भारतीय संघाप्रमाणे असेल. विधानसभेची मॅच आमची महायुती जिंकेल. त्यादिशेने आम्ही अग्रेसर झालो आहोत," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावताना हा बालिशपणा आहे असं म्हटलं आहे. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात. हा बालिशपणा आहे. काल भारत देश, इंडिया जिंकला आहे. सगळी १०० कोटी लोक आपण जिंकलो आहेत. खासकरुन राहुल द्रविड यांनी भावना दाखवल्या तेव्हा मला फार बरं वाटलं. आम्ही त्यांना पाहत मोठे झालो आहोत. त्यांनी वर्ल्डकप उचलला ते पाहून बरं वाटलं," असं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024आदित्य ठाकरेदेवेंद्र फडणवीस