"मेस्सी आणि रोनाल्डोच्या विरुद्ध..."; मनसेच्या वरळीतल्या बॅनरवरुन आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 07:49 PM2024-06-22T19:49:47+5:302024-06-22T19:54:47+5:30

Worli Assembly constituency : वरळी विधानसभा मतदारसंघात यंदा ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी तगडी लढत होण्याची शक्यता आहे.

Aditya Thackeray criticism of MNS baner in Worli Assembly Election | "मेस्सी आणि रोनाल्डोच्या विरुद्ध..."; मनसेच्या वरळीतल्या बॅनरवरुन आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

"मेस्सी आणि रोनाल्डोच्या विरुद्ध..."; मनसेच्या वरळीतल्या बॅनरवरुन आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

MNS vs Aaditya Thackeray : लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी एकत्र विधानसभा निवडणूक लढवणार आहे. तर महायुतीचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेने विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी सुरु केली आहे. अशातच मनसेने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात तयारी सुरु केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. अशातच वरळीत होत असलेल्या बॅनरबाजीवरुन आदित्य ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने वरळी विधानसभा मतदारसंघात जोरदार बॅनरबाजी सुरु केली आहे. या बॅनवरुन आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय. अशातच वरळीत लावलेल्या एका बॅनवरुन आदित्य ठाकरेंना पाडण्याचा निर्धार मनसेने केला आहे. बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप वरळीत आणूया, असे या बॅनरवर म्हटलं आहे. या बॅनवरुन आता आदित्य ठाकरे यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे.

वरळीत विधानसभेला आदित्य ठाकरे विरुद्ध संदिप देशपांडे लढत होण्याची शक्यता आहे. मनसेने त्या आशयाची बॅनरबाजी देखील वरळीत केली आहे. "बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार, संदीप वरळीत आणूया. वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे सन्माननीय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार विधानसभेत पाठवूया. यंदा वरळीकरांचं ठरलंय", असे बॅनर मनसे कार्यकर्त्यांनी वरळी विधानसभा क्षेत्रात लावले आहेत. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी डर अच्छा है असं म्हटलं आहे.

"काही पक्ष हे सुपारी घेणाऱ्यातले आहेत. त्यांच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. पण नक्कीच सगळ्यांनी तिथे लक्ष घालावे. कारण मेस्सी आणि रोनाल्डोच्याच सगळे विरोधात उतरतात. बाकी कुणाच्या विरुद्ध उतरत नाही. डर अच्छा है. एवढे लोक मला घाबरतात ही चांगली गोष्ट आहे," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान, राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यावरुन वर्धानपनदिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली होती. "लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला, तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. मात्र, आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

Web Title: Aditya Thackeray criticism of MNS baner in Worli Assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.