Join us  

“निर्लज्जपणे ५४ चुका झाल्याचे सांगून...”; सीईटी सेलच्या आयुक्तांवर आदित्य ठाकरेंचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 2:54 PM

Aditya Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सीईटी सेलच्या स्पष्टीकरणावरुन आयुक्तांवर ताशेरे ओढले आहेत.

MHT-CET Exam Result : देशभरात नीट परीक्षेवरुन गोंधळ सुरु असताना राज्यात एमएचटी-सीईटीच्या निकालाबाबतही विद्यार्थी-पालकांकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. इंजिअरिंग, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी सीईटी सेलकडून एमएचटी-सीईटी घेण्यात येते. मात्र आता एमएचटी-सीईटीच्या परीक्षेत आन्सर कीवर मिळालेले मार्क आणि पर्सेंटाइल यात तफावत असल्याची तक्रार विद्यार्थी-पालकांनी केली. तसेच या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर सीईटी सेलच्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांना दोन दिवसांसाठी उत्तरपत्रिका आन्सर की पाहता येणार असल्याचे म्हटलं आहे. मात्र आदित्य ठाकरेंनी सीईटी सेलवर ताशेरे ओढले आहेत.

सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्यासोबत उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. सीईटीच्या निकालाबाबत विविध आक्षेप नोंदवल्यानंतर सीईटी सेलने विद्यार्थ्यांना २७ व २८ जून रोजी सीईटीच्या वेबसाईटवरुन आन्सर की पाहण्याची संधी दिली आहे. तसेच ही परीक्षेची पद्धत पूर्णपणे पारदर्शक असल्याचे सीईटी सेलने सांगितले. मात्र आता आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या हातात उत्तरपत्रिका देण्याची मागणी केली आहे.

उत्तरपत्रिका हातात दिल्यातर कोणतं नुकसान होणार - आदित्य ठाकरे

“सीईटीच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी तीन आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. त्यातील दोन आयुक्त हे परीक्षेसोबत संबंध नसणारे होते तर दुसरे हे भाजपचे प्रवक्ते पण आहेत. हे सगळं होत असताना आम्ही किंवा विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारले होते त्याचे एकतरी उत्तर मिळाले का? निर्लज्जपणे सांगितले की गेल्या वेळी ४० चूका झाल्याचे सांगितले आणि यावर्षी ५४ चुका झाल्याचे सांगितले. चुका करण्याऱ्यांना निलंबित केले पाहिजे.  यातून सीईटी सेलला पैसे मिळाले आहेत. उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात का नाही देत आहात? उत्तरपत्रिका हातात दिल्यातर कुठे एवढं नुकसान होणार आहे. पर्सेंटाइल दिले तसे मार्क सांगा आणि उत्तरपत्रिका हातात द्या या दोनच आमच्या मागण्या आहेत,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सीईटी सेलचे स्पष्टीकरण

एमएचटी – सीईटी परीक्षा पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. हीच पद्धत नंतर केंद्र सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीनेही परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे विविध सत्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येते, असे स्पष्टीकरण दिलीप सरदेसाई यांनी दिले. तर  “याठिकाणी कोणी राजकारण आणू नये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचीही प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहोत, त्यामुळे कोणीही अपप्रचार करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नये,” असे डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांना परत मिळणार पैसे

विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेची फेरतपासणी करण्यासाठी एक हजार रुपयांचे शूल्क भरले होते. हे पैसे विद्यार्थ्यांना परत देण्यात यावी अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली होती.  १,४२५ विद्यार्थ्यांनी हरकत घेऊन फेरतपासणीची मागणी केली होती. त्यानंतर सीईटी सेलने विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या रक्कमेपैकी जे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले आहेत, अशा ५४ जणांना त्यांचे पैसे बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येतील, अशी माहिती दिली आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेपरीक्षाभाजपा