Join us

"नोव्हेंबरला आमचं सरकार येणार, मग..."; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 5:36 PM

रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा हाती घेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. 

मुंबई - मुंबई महापालिका MMRDA ला पैसे देतंय, कंत्राटदारांवर उधळपट्टी करतंय. परंतु स्वत:च्या कामगारांसाठी आणि स्वत:च्या BEST साठी पैसे देत नाही. राज्य सरकारच्या गाजर बजेटमध्ये मुंबईला काही मिळाले नाही आणि केंद्र सरकारचं भोपळा बजेट होतं त्यात महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही. मग एवढ्या पैशांची उधळपट्टी मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. या नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार बसणार आहे, त्यानंतर मुंबईच्या रस्त्यांची कामांची सखोल चौकशी करणार असा इशारा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईची सध्या लूट सुरू आहे. आमचं सरकार आल्यानंतर कुठलेही अधिकारी असतील, शिंदे सरकारमधील मंत्री असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकणार आहे. कंत्राटदार कुठेही नाही, पोलिसांना खड्डे भरायला लावले जातात. मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक आणि मुंबई अहमदाबाद  हे तिन्ही महामार्ग केंद्र सरकारच्या अख्यारित्य आहेत. महाराष्ट्र द्वेष कशासाठी आहे? महामार्गावर खड्डेच खड्डे, वारंवार डेडलाईन देऊनही खड्डे भरलेले नाहीत. नितीन गडकरींनी महामार्गाची पाहणी केली पाहिजे. आमच्या महाराष्ट्रात NHAI ने एकही चांगला रस्ता बनवलेला नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच गेल्या १० वर्षापासून MSRDC हे खाते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिथेही खड्डे आहेत. अपघात वाढत आहेत. कोस्टल रोडचं अर्धवट उद्धाटन केले. वांद्रे वर्सोवा सी लिंकसाठी पावणे ७ हजार कोटी आतापर्यंत खर्च झालेत. त्यात एकही गर्डर लागले नाहीत. २ कंत्राटदार बदलले, सरकार बदलली, हे खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे. काम झालं किंवा नाही झालं, कंत्राटकारांना पैसे दिले जातात. महाराष्ट्राची ही लूट आहे. येणारं सरकार महाविकास आघाडीचं आहे. सगळे भ्रष्ट कंत्राटदार, अधिकारी जे कुणी असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, रस्त्यावरील खड्डे हा कुठलाही राजकीय विषय नाही, हा प्रत्येकाशी निगडीत विषय आहे. तुम्ही करदाते आहात. महाराष्ट्रातून सर्वाधिक कर जातो मग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून एवढे बेकार रस्ते का मिळत आहेत?, २ वर्षात खड्डेमुक्त करू असं बोललं जातं. ठाण्यातच किती खड्डे पडलेले दिसतात. मागील २ वर्ष महापालिका निवडणुका झाल्या नाहीत. महाराष्ट्रातील जनता या सरकारला दणका देणार आहे असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेमुंबई महानगरपालिका