लोअर परळमध्ये जाहिरात काढली पण लोखंडी ढाचा तसाच; आदित्य ठाकरेंच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 01:58 PM2024-08-03T13:58:20+5:302024-08-03T14:00:25+5:30

घाटकोपर होर्डिंग अपघातात १७ जणांचा बळी गेलेला असताना मुंबई महापालिकेला अद्याप जाग आलेली नाही

Aditya Thackeray criticizes BMC over illegal hoarding in Lower Paral | लोअर परळमध्ये जाहिरात काढली पण लोखंडी ढाचा तसाच; आदित्य ठाकरेंच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

लोअर परळमध्ये जाहिरात काढली पण लोखंडी ढाचा तसाच; आदित्य ठाकरेंच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

Mumbai Hoarding:  घाटकोपरमध्ये दोन महिन्यांपूर्वी होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १७ लोकांचा नाहक बळी गेला. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये महाकाय जाहिरातीचे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले होते. गैरव्यवहार करुन हे होर्डिंग लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. त्यानंतर मुंबईतील होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला. महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरु केली होती. मात्र १७ लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाची अद्यापही या कारवाईबाबत चालढकल सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. लोअर परळमध्ये अशाच एका होर्डिंगवरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं आहे.

१३ मे रोजी जोरदार वाऱ्यामुळे घाटकोपरच्या छेडा नगर भागातील पेट्रोल पंपावर एक मोठे होर्डिंग पडले होते. हे होर्डिंग बेकायदेशीर असून १५ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त परिसरात लावण्यात आल्याचे तपासात समोर आले. या होर्डिंग खाली दबून १७ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने शहरभर लागलेल्या होर्डिंगचा अहवाल मागवून त्यावर कारवाई करण्यात आली. मात्र लोअर परळमध्ये लावलेल्या महाकाय होर्डिंगवर अद्याप कारवाई झाले नसल्याचे समोर आलं आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स सोशल मिडिया पोस्टमधून या विषयी महापालिकेचे लक्ष वेधलं आहे. दरम्यान आपल्या सांगण्यानंतरही कारवाई झाली नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"लोअर परळ येथील खिमजी नागजी चाळ क्र. २ च्या शेजारीच जनता कंपाऊंडच्या मालकाद्वारे महाकाय लोखंडी होर्डिंग उभारण्यात आले आहे. हे होर्डिंग ६० फूट पेक्षा अधिक उंच आहे. नुकतीच घाटकोपर, कल्याण येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटना आणि त्यामध्ये झालेली जीवितहानी लक्षात घेता येथील रहिवासी भीतीच्या छायेत राहत आहेत. आपण ह्यासंदर्भात महापालिका आयुक्त भूषण गगरानी जी ह्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्या महाकाय होर्डिंगवरील जाहिरात काढून टाकण्यात आली मात्र हा लोखंडी ढाचा अजूनही तसाच आहे. ह्यामुळे भविष्यात होणारी हानी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा धोकादायक लोखंडी ढाचा लवकरात लवकर हटवण्यात यावा. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी," अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

कल्याणमध्येही होर्डिंग दुर्घटना

शुक्रवारी, कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही दुर्घटना घडली. २० बाय १५ फूट आकाराच्या या होर्डिंगचा आधार सांगाडा लाकडाचा होता.
 

Web Title: Aditya Thackeray criticizes BMC over illegal hoarding in Lower Paral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.